पुण्यात येणारे मार्ग "फुल' 

पुण्यात येणारे मार्ग "फुल' 

पुणे - दिवाळीच्या सुट्या संपल्याने बाहेरगावी गेलेले लोक आता पुण्यात परतू लागल्यामुळे शहरात प्रवेश करणाऱ्या सर्व प्रमुख मार्गांवर रविवारी दिवसभर वाहनांची प्रचंड वर्दळ होती. त्यामुळे मुंबई-पुणे, नाशिक-पुणे, सातारा-पुणे, सोलापूर-पुणे, नगर-पुणे या मार्गांवरील वाहतूक अत्यंत संथगतीने सुरू होती. सायंकाळनंतर गर्दी वाढल्याने ठिकठिकाणी वाहतूक कोंडी झाल्याने प्रवासी हैराण झाल्याचे चित्र होते. मात्र, स्थानिक नागरिक, कार्यकर्ते आणि वाहतूक पोलिसांमुळे काही भागातील वाहतूक सुरळीत करण्यात आली. त्यामुळे प्रवाशांना काहीसा दिलासा मिळाला. पुणे-मुंबई महामार्ग व द्रुतगती मार्गावरील वाहतूक रात्री उशिरापर्यंत संथगतीने सुरू होती. 

दिवाळीनिमित्त बाहेरगावी व आपल्या घरी गेलेले लोक सुटी संपल्याने आज पुण्यात येत होते. त्यामुळे शहरात येणाऱ्या मार्गांवर वाहनांची गर्दी वाढल्याने दुपारपासूनच वाहनांच्या मोठ्या रांगा लागल्या होत्या. खबरदारीचा उपाय म्हणून या मार्गांवर वाहतूक व महामार्ग पोलिसांची नियुक्ती केली होती. तरीही, काही ठिकाणी वाहतूक विस्कळित झाल्याचे दिसून आले. लोणावळ्यात पर्यटकांच्या गर्दीमुळे या ठिकाणी पुणे-मंबई द्रुतगती मार्गावर सायंकाळनंतर वाहतुकीचा वेग खूपच मंदावल्याने प्रवाशांची गैरसोय झाली. 

नाशिक-पुणे मार्गावर मंचर येथे दुपारपासूनच वाहनांच्या मोठ्या रांगा लागल्या होत्या. त्यात आठवडी बाजारामुळे भर पडली. सोलापूर-पुणे मार्गावर उरुळी कांचन, हडपसर परिसरात वाहतूक विस्कळित झाली होती. अवैध वाहतूक करणारी वाहने रस्त्यालगतच थांबल्याने कोंडीत भर पडत होती. नगर-पुणे रस्त्यावर सायंकाळनंतर वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. येथील वाहतूक दीड-दोन तास पुढे न सरकल्याने वाहनचालक आणि प्रवाशांचे हाल झाले. वाघोली ते शिक्रापूरपर्यंत जड वाहनांना बंदी असल्याने वाहतूक कोंडी जाणवली नाही. त्यानंतर मात्र वाहने रस्त्यावर थांबल्याचे दिसून आली. पिंपळगाव फाटा, शिवगिरी मंगल कार्यालय, बस स्थानक व मुळेवाडी चौकात वाहतूक विस्कळित झाली होती. 

नगर रस्त्यावरील शिक्रापूर, चाकण आणि रांजणगाव भागामध्ये वाहतूक संथ गतीने सुरू होती. काही ठिकाणी दोन तीन किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. त्यामुळे प्रवासामध्ये खूपच जास्त वेळ गेला. 
- गोविंद चव्हाण, वाहनचालक 

कोल्हापूर-पुणे रस्त्यावर कऱ्हाड, शिरवळ, साताऱ्याजवळ वाहतूक कोंडी झाली होती. संपूर्ण मार्गावर वाहतूक संथ गतीने सुरू होती. कोल्हापूरहून पुण्यात येण्यासाठी सात तासांपेक्षा अधिक वेळ लागला. 
- अनिकेत भामे, प्रवासी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com