आम्ही गुन्हेगार आहोत का?

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 23 नोव्हेंबर 2016

मुख्य प्रवेशद्वारावर सीसीटीव्हीसमोर स्कॅनरद्वारे बॅगची तपासणी करण्यात येते. प्लॅटफॉर्मवर अथवा अन्यत्र कोठेही प्रवाशांच्या बॅगची तपासणी करू नये, असे स्पष्ट आदेश रेल्वे सुरक्षा बलाच्या पोलिसांना दिले आहेत. संशयित व्यक्‍ती आढळल्यास पोलिसांनी नियंत्रण कक्षात कळवून सीसीटीव्हीसमोरच बॅगची तपासणी करावी.
- डी. विकास, विभागीय सुरक्षा आयुक्‍त, रेल्वे सुरक्षा बल

रेल्वे प्रवाशांची संतप्त प्रतिक्रिया; बॅग तपासणीच्या नावाखाली पोलिसांकडून अवमानास्पद वागणूक
पुणे - 'रेल्वे प्लॅटफॉर्मवर उतरल्यानंतर पोलिसांनी आम्हाला अक्षरशः गुन्हेगारासारखी वागणूक दिली. काही कारण न सांगता सर्वांसमोर अरेरावी करीत बॅगा, सुटकेस उघडण्यास सांगितले. सर्वसामान्यांना अशी वागणूक मिळणार असेल तर काही खरं नाही. हेच "अच्छे दिन' का? त्यांची चौकशी व्हायला हवी,'' अशी संतप्त प्रतिक्रिया ज्येष्ठ दांपत्य सुभाष राठी आणि शीला राठी यांनी "सकाळ'शी बोलताना व्यक्‍त केली.

राठी दांपत्य नागपूर-पुणे एक्‍स्प्रेसने मंगळवारी (ता. 22) सकाळी दहाच्या सुमारास पुणे रेल्वे स्थानकावर उतरले. जिन्याकडे जात असताना त्यांना सफारी घातलेल्या पोलिसांनी अडविले. त्यांनी पोलिस असल्याचे ओळखपत्र दाखवून जबरदस्तीने बॅगा उघडण्यास सांगितले. सुटकेस, हॅंडबॅगची तपासणी केली.

पण आक्षेपार्ह काही आढळले नाही. इतर काही प्रवाशांनाही असाच अनुभव आला. गेली 45 वर्षे आम्ही पुण्यात राहतो; पण असे कधी घडले नाही. प्लॅटफॉर्मवर पोलिसांकडून हा काय प्रकार सुरू आहे? त्यांना काय साध्य करायचे आहे?, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

'आम्ही गत वर्षी अमेरिकेत गेला होतो. तेथे तपासणीच्या नावाने कोणी उद्धट वागले नाही; परंतु येथे तर कमालच झाली. बॅगा उचकटून तपासणी करण्यात येत होती. हा प्रकार बघून काय करावं, हे सुचत नव्हतं. आपण स्वतंत्र भारताचे नागरिक आहोत ना?, असा प्रश्‍न मनाला पडला,'' अशा शब्दांत शीला राठी यांनी आपली कैफियत मांडली.

दरम्यान, रेल्वे स्थानकावर पोलिसांकडून प्रवाशांच्या बॅग जबरदस्तीने उघडून तपासल्या जात असल्याच्या तक्रारी येत आहेत. या प्रकरणी संबंधित वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी गांभीर्याने लक्ष द्यावे, अशी मागणी रेल्वे प्रवाशांकडून करण्यात येत आहे.

या संदर्भात प्रवाशांनी तक्रार द्यावी. पुणे रेल्वे स्थानकावर असा प्रकार घडला असल्यास त्याची चौकशी करून संबंधितांविरुद्ध कारवाई करण्यात येईल.
- तुषार दोशी, अतिरिक्‍त पोलिस अधीक्षक, पुणे लोहमार्ग

Web Title: We are the criminals?