आघाडीला आमचाही आग्रह नाही - अजित पवार 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 6 जानेवारी 2017

पुणे - स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत समविचारी पक्षांशी आघाडी करायची, असे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सूत्र आहे; परंतु कॉंग्रेसला जर पुण्यात महापालिका निवडणुकीत आघाडी करायची इच्छा नसेल, तर त्यासाठी आमचाही आग्रह नसेल, असे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते अजित पवार यांनी गुरुवारी येथे स्पष्ट केले. 

पुणे - स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत समविचारी पक्षांशी आघाडी करायची, असे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सूत्र आहे; परंतु कॉंग्रेसला जर पुण्यात महापालिका निवडणुकीत आघाडी करायची इच्छा नसेल, तर त्यासाठी आमचाही आग्रह नसेल, असे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते अजित पवार यांनी गुरुवारी येथे स्पष्ट केले. 

महापालिकेत आयोजित कार्यक्रमापूर्वी अजित पवार म्हणाले, ""कॉंग्रेसबरोबर आघाडी करायची, असा निर्णय पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी कॉंग्रेसच्या प्रदेश स्तरावरील नेत्यांबरोबरील चर्चेत घेतला आहे; मात्र आघाडीचा निर्णय स्थानिक घटकांनी सुरवातीला घ्यावा, असेही ठरले आहे. त्यामुळे पुण्यात कॉंग्रेसची इच्छा नसेल, तर आम्ही आग्रह करणार नाही. आम्हीही स्वतंत्रपणे निवडणूक लढविण्यास सक्षम आहोत.'' जागावाटप सन्मानाने व्हायला हवे, असेही त्यांनी सांगितले. 

मेट्रो असो अथवा विकास आराखडा, सगळे काही आमच्यामुळेच झाले आहे, अशी आभासी भूमिका भाजप घेत असून, ते योग्य नाही. मेट्रोच्या भूमिपूजनाला तर त्यांनी शिवसेनेलाही बरोबर घेतले नाही. यावरून त्यांच्या कार्यपद्धतीचा अंदाज येतो, असे पवार म्हणाले. राजकीय दृष्टिकोनातून शहराच्या विकासाचे नियोजन करता कामा नये, असेही मत त्यांनी व्यक्त केले. 

मराठा आरक्षणाबाबत राज्य सरकार दुहेरी चाल खेळत आहे. 52 टक्के आरक्षणाला धक्का न लावता तमिळनाडूच्या धर्तीवर आरक्षण देण्यासाठी राज्य सरकारने उपाययोजना केल्या पाहिजेत. केंद्रात त्यांचेच सरकार आहे. त्यांचीही याबाबत मदत घेतली गेली पाहिजे, असेही पवार यांनी स्पष्ट केले. 

मराठा समाजाचा दोष नाही 
राम गणेश गडकरी यांच्या पुतळ्याबाबत घडलेल्या घटनेवर भाष्य करताना पवार म्हणाले, ""संभाजी ब्रिगेडच्या चार युवकांनी ती घटना केली, म्हणून त्यात मराठा समाजाचा काहीही संबंध नाही. ते चार युवक म्हणजे मराठा समाज नाही.'' ही घटना म्हणजे विकृती आहे. त्यामुळे या घटनेमागच्या मास्टर माइंडचा राज्य सरकारने शोध घ्यावा, या मागणीवर आम्ही आजही ठाम आहोत, असेही त्यांनी सांगितले. 

शंका-कुशंका ठेवून उद्‌घाटने नको 
मेट्रोचे भूमिपूजन पंतप्रधानांनी केले; मात्र त्यानंतर लगेचच एनजीटीने मेट्रो मार्गाला स्थगिती दिली. पंतप्रधानांना बोलविण्यापूर्वी प्रकल्प निर्दोष आहे, याची तरी खात्री त्यांच्या पक्षाने करायला हवी. यापूर्वीच्या पंतप्रधानांनी "असे' कधीही केले नव्हते. पंतप्रधानांना अंदाजे बोलविणे कितपत योग्य आहे, याचाही विचार करायला हवा, असे मत पवार यांनी व्यक्त केले. महापालिका निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून पंतप्रधानांना बोलावून शहराच्या योजनांची भूमिपूजने, उद्‌घाटने करणे योग्य नाही, असेही ते म्हणाले.

Web Title: We do not insist on alliance - pawar