अपारंपरिक ऊर्जेला प्राधान्य देणे गरजेचे - ऍड. चव्हाण

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 21 मार्च 2017

पुणे - 'हिरवाईचे कवच वाढवून अपारंपरिक ऊर्जेचा जास्त वापर करण्याला प्राधान्य दिले पाहिजे. नैसर्गिक साधन-संपत्तीचाही योग्य वापर होणे आवश्‍यक असून, सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प उभारण्याकडे गांभीर्याने पाहण्याची गरज आहे. सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेला महत्त्व दिल्यास खासगी वाहनांचे प्रमाण कमी होईल. या सगळ्या प्रयत्नांतूनच जागतिक तापमानवाढीच्या प्रश्‍नावर उत्तर शोधणे शक्‍य होईल,'' असे मत खासदार ऍड. वंदना चव्हाण यांनी व्यक्त केले.

रोटरी क्‍लब 3131 तर्फे पत्रकार भवन येथे "जलोत्सव 2017' या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी जलसंपदा विभागाचे निवृत्त सचिव व्ही. एम. रानडे, नियोजित प्रांतपाल शैलेश पालकर, सेरुलिन इनव्हायरो टेक कंपनीचे अजय मोकाशी, सोनाली मोकाशी, प्लंबर असोसिएशनचे अध्यक्ष सुभाष देशपांडे, रोटरी क्‍लब ऑफ पूना डाउनटाउनच्या अध्यक्ष पल्लवी साबळे, रोटरी शनिवारवाड्याच्या अध्यक्ष मीना भोंडवे व संयोजक सतीश खाडे उपस्थित होते. "जीवित नदी'चे मनीष घोरपडे, "ग्रीन थंब'चे कर्नल (निवृत्त) सुरेश पाटील यांचा या वेळी सत्कार करण्यात आला.

ऍड. चव्हाण म्हणाल्या, 'सार्वजनिक वाहतूक व्यवस्था बळकट करून खासगी वाहनांचा वापर कमी करण्यासाठी प्रयत्नशील राहिले पाहिजे. पदपथांचा वापर, सायकल मार्गीकांचा सायकलसाठीच उपयोग करणे, पाण्याच्या नियोजनावरही लक्ष देण्याची गरज आहे. सध्या जागतिक तापमानवाढीचे संकट जगासमोर आहे. त्यासाठीच जलसाक्षर होणे महत्त्वाचे आहे. चाळीस टक्के गळतीमुळे पाणी वाया जाते. ही गळती रोखण्यासाठी नवीन जलवाहिन्या टाकण्याची गरज आहे. नदी ही कोणत्याही शहराची जीवनदायिनी असते. नदीचे पाणी स्वच्छ राहिले पाहिजे.''

मोकाशी यांनी पाण्याच्या पुनर्वापर प्रक्रियेची माहिती दिली.

Web Title: We need to give priority to renewable energy