विकासाचे स्वप्न आम्हीच साकार करू- बापट

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 12 फेब्रुवारी 2017

एकात्मिक वाहतूक आराखड्याची शंभर टक्के अंमलबजावणी केल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही. पुणेकरांसाठी सुसज्ज, विकसित वाहनतळ, सायकल ट्रॅक, उड्डाण पुलांची निर्मिती अतिक्रमणमुक्त फुटपाथ आणि रिंगरोडची पूर्तता या दिशेने आमची वाटचाल चालू आहे.

पुणे - "पुण्यनगरीचा आगामी महापौर भाजपचाच असेल. स्वच्छ आणि सुंदरच नव्हे तर त्या पलीकडे जाऊन "स्मार्ट' पुण्याचे स्वप्न प्रत्यक्षात आणणे ही भाजपची दिशा आहे. पुणेकरांना खरे वाटणार नाही इतक्‍या अल्पावधीत मेट्रोची उभारणी करून प्रवाशांना अतिजलद गतीने मेट्रोद्वारे चारही दिशांना पोचविण्याचे काम आम्ही वेगाने हातीही घेतले आहे,'' असे पालकमंत्री गिरीश बापट यांनी "सकाळ'शी बोलताना स्पष्ट केले.

महापालिका निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर पक्षाची भूमिका बापट यांनी मांडली. ते म्हणाले, ""विरोधकांवर ऊठसूट नकारात्मक टीका करीत बसण्यापेक्षा विकासाच्या मुद्द्यावर भर देऊन आम्ही मतदारांना सामोरे जात आहोत. रेंगाळलेली कामे मार्गी लावण्यासाठी सत्तेवर येताच आम्ही "पीएमआरडीए'ची स्थापना केली. ही संस्था पुण्याचा प्रगतीचा वेग झपाट्याने वाढवीत आहे. त्यासाठी एकात्मिक विकास योजना, मेट्रोचा सुखकर प्रवास आणि रिंगरोडच्या कामाला गती देणे यावर भर देण्यात आला आहे. निवडणूक संपताच त्याचे दृश्‍य स्वरूप पुणेकरांना पाहायला मिळेल.

"मेट्रोसाठी 950 कोटींचा निधी उपलब्ध झाला असून, देशातील हा एकमेव देखणा प्रकल्प असेल याची मला खात्री आहे. शहराची वाटचाल आधुनिकतेकडे होत आहे म्हणूनच शंभर टक्के डिजिटल साक्षरता आणि वाय-फाय पुणे कार्यान्वित करण्यासाठी आमचा पक्ष कटिबद्ध आहे. गेली अनेक वर्षे वादग्रस्त ठरलेल्या विकास आराखड्याचा गुंता सत्तेवर येताच भाजपने सहजपणे सोडवून दाखविला. आता त्याची वेळापत्रकानुसार गतिमान आणि प्रभावी अंमलबजावणी करणे हे आमचे ध्येय आहे. यात भर म्हणून आंतरराष्ट्रीय नकाशावर पुण्याचे नाव अभिमानाने झळकावे यासाठी नुकताच मंजूर झालेला आंतरराष्ट्रीय विमानतळाचा प्रकल्प येत्या काही वर्षांत प्रत्यक्षात येईल. त्या दृष्टीने हालचालीही सुरू झाल्या आहेत, त्यामुळे पुण्यातील उद्योजकांकडून निर्यातीला चालना मिळेल. पश्‍चिम महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचा शेतमाल देशोदेशी पोचेल, शहर आणि जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्मिती होईल. निवडणूक प्रचारात या मुद्यावर आमचा भर आहे.

खड्डेमुक्त रस्ते आम्ही करून दाखविणार असल्याचे सांगून ते म्हणाले, "एकात्मिक वाहतूक आराखड्याची शंभर टक्के अंमलबजावणी केल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही. पुणेकरांसाठी सुसज्ज, विकसित वाहनतळ, सायकल ट्रॅक, उड्डाण पुलांची निर्मिती अतिक्रमणमुक्त फुटपाथ आणि रिंगरोडची पूर्तता या दिशेने आमची वाटचाल चालू आहे. सार्वजनिक वाहतुकीची पीएमपीएमएलची व्यवस्था पूर्णपणे कोलमडली असून, बसची संख्यावाढ करून महिला, कामगार व दुर्बल घटकांना "पीक अवर्स'मध्ये विनामूल्य बससेवा देण्यासाठी आम्ही वचनबद्ध आहोत.''

Web Title: We realize the dream of development says Girish Bapat