आपल्या शिक्षण प्रणालीत आमूलाग्र बदल करण्याची गरज आहे - माजी कुलगुरु डॉ. राम ताकवले

मिलिंद संगई
सोमवार, 19 मार्च 2018

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ व विद्या प्रतिष्ठान शैक्षणिक संकुलाच्या वतीने आयोजित तिसऱ्या पदवीदान समारंभ पार पडला. 

बारामती - बदलत्या काळाची पावले ओळखून विद्यापीठ आणि महाविद्यालयांनीही आपल्या शिक्षण प्रणालीत आमूलाग्र बदल करण्याची आवश्यकता आहे, अशी अपेक्षा सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे माजी कुलगुरु डॉ. राम ताकवले यांनी व्यक्त केली. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ व विद्या प्रतिष्ठान शैक्षणिक संकुलाच्या वतीने आयोजित तिसऱ्या पदवीदान समारंभात डॉ. ताकवले बोलत होते. विद्या प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष अॅड. ए. व्ही. प्रभुणे अध्यक्षस्थानी होते. संस्थेचे सचिव द. रा. उंडे, विश्वस्त अॅड. नीलीमा गुजर, डॉ. राजीव शहा, रजिस्ट्रार श्री श. कंभोज या प्रसंगी उपस्थित होते. 

विद्या प्रतिष्ठान कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय, वसंतराव पवार विधी महाविद्यालय, विद्या प्रतिष्ठान स्कूल ऑफ बायोटेक्नॉलॉजी, इंदापूरचे कला व वाणिज्य महाविद्यालय, शिक्षणशास्त्र व अभियांत्रिकी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी या पदवीदान समारंभाचे आयोजन केले गेले. ताकवले म्हणाले, इंटरनेटच्या तुफान वेगामुळे आता अनेक प्रश्नही निर्माण होऊ लागले आहेत. गुगल जर सर्वच प्रश्नांची उत्तरे देणार असेल तर शिक्षणाचा उपयोग काय असा प्रश्न निर्माण होणे साहजिकच आहे, फिनलंडसारख्या देशात स्पर्धेऐवजी सहभागातून शिक्षण ही प्रणाली विकसीत झाली आहे, भारतीय शिक्षण व्यवस्थेलाही आता अशाच नव्या शिक्षण पध्दतीचा अवलंब करावा लागेल. पदवी घेऊन पुढे काय करायचे हा प्रश्न निर्माण होणार असेल तर अशा शिक्षणपध्दतीत आमूलाग्र बदल करावेच लागतील. याप्रसंगी अॅड. ए. व्ही. प्रभुणे यांनीही विद्या प्रतिष्ठान संस्थेच्या वतीने पुणे विद्यापीठाला सर्वतोपरी मदतीची ग्वाही दिली. त्यांनीही आपल्या मनोगतात शिक्षण प्रणालीचा उहापोह केला. प्राचार्य डॉ. भरत शिंदे यांनी प्रास्ताविक केले तर डॉ. अय्यर यांनी आभार मानले. 

 

Web Title: we should change our education system ex vice chancellor dr ram takvale