पुणे : जूनचा पगार व्याजासह मिळावा; पोलिसांची मागणी 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 30 जुलै 2019

जिल्हा पोलिस दलातील दोन हजारांहून अधिक पोलिस कर्मचाऱ्यांना जून महिन्याचा पगार अद्याप मिळालेला नाही. त्यामुळे त्यांच्या कुटुंबांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे.

लोणी काळभोर : जिल्हा पोलिस दलातील दोन हजारांहून अधिक पोलिस कर्मचाऱ्यांना जून महिन्याचा पगार अद्याप मिळालेला नाही. त्यामुळे त्यांच्या कुटुंबांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. पोलिस मुख्यालयातील एका पोलिस कर्मचाऱ्याने पोलिस अधीक्षक संदीप पाटील व वरिष्ठ अधिकाऱ्यांना पत्र लिहून पगार आणि त्यावरील महिन्याचे व्याज मिळावे, अशी मागणी केली आहे. 

जिल्हा (ग्रामीण) पोलिस दलांतर्गत 31 पोलिस ठाणी व विशेष विभागांत मिळून तीन हजारांहून अधिक कर्मचारी आहेत. त्यांचा पगार प्रत्येक महिन्याच्या 1 किंवा 2 तारखेला बॅंक खात्यात जमा होतो. मात्र सातवा वेतन आयोग लागू केल्यापासून पगार वेळेवर मिळत नसल्याची तक्रार आहे. मे महिन्याचा पगार जमा होण्यास जूनचा शेवटचा आठवडा उजाडला होता. जूनचा पगारही जुलैच्या 20 ते 25 तारखेच्या दरम्यान होईल, अशी अपेक्षा होती. मात्र, केवळ सहायक फौजदार व पोलिस नाईक दर्जाच्या कर्मचाऱ्यांचा पगार तीन दिवसांपूर्वी बॅंकेत जमा झाला. उर्वरित दोन हजारांहून अधिक कर्मचाऱ्यांच्या पगाराबाबत कोणताच अधिकारी बोलण्यास तयार नसल्याने, खात्यात नाराजी पसरली आहे. 

याबाबत नाव न छापण्याच्या अटीवर "सकाळ'शी बोलताना काही कर्मचाऱ्यांनी सांगितले की, पुणे शहर पोलिस दलातील कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग यापूर्वीच लागू झाला आहे. त्यानुसार त्यांचे पगार वेळेवर जमा होत आहेत. पिंपरी चिंचवड पोलिस दलातील कर्मचाऱ्यांनाही वेतनवाढ मिळाली आहे. ग्रामीण पोलिस दलातील कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग अद्याप लागू केलेला नाही, परंतु आहे तो पगार तरी लवकर द्या, अशी मागणी आहे. 

'येत्या 5 दिवसांत पगार जमा होईल' 

पगार विलंबाबाबत कार्यालयीन अधिक्षक रवींद्र महाले म्हणाले, "सरकारने सातवा वेतन आयोग लागू करताना, मागील तीन वर्षांचा फरक काढण्यास सांगितल्याने पगारास विलंब होत आहे. तीन हजार कर्मचाऱ्यांचा तीन वर्षांचा फरक काढण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. मात्र, त्यात काही अडचणी येत आहेत. यातूनही मार्ग काढत 30 टक्के कर्मचाऱ्यांचे वेतन जमा केले आहे. उर्वरित कर्मचाऱ्यांचे वेतन पुढील पाच दिवसांत जमा करण्यात येणार आहे.

'सर्व्हरवर ताण आल्याने पगारास विलंब' 

याबाबत जिल्हा पोलिस अधीक्षक संदीप पाटील म्हणाले, "सातव्या वेतन आयोगाच्या शिफारशीनुसार मागील तीन वर्षांचा फरक जमा करण्याचा हा शेवटचा महिना आहे. त्यामुळे सरकारच्या सर्व्हरवर ताण येत असल्याने राज्यातील सर्वच पोलिस कर्मचाऱ्यांच्या पगाराची ही स्थिती आहे. त्यातून मार्ग काढण्याचे काम चालू आहे. मात्र, सर्व्हरवर सर्व काही अवलंबून आहे.'' 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: We Want June salary with interest demanding police personnel