पुणे जिल्ह्यातील तब्बल एक हजार जणांना करणार तडीपार : संदीप पाटील

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 2 एप्रिल 2019

दोन टप्प्यात होणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीसाठी 2300 पोलिस कर्मचारी तैनात असतील. 

बारामती शहर : आगामी लोकसभेची निवडणूक निर्भयपणे व शांततेच्या वातावरणात पार पडावी, यासाठी पुणे जिल्हा पोलिस तब्बल एक हजार जणांना मतदानाच्या काळात सात दिवस तडीपार करणार असल्याची माहिती जिल्हा पोलिस अधीक्षक संदीप पाटील यांनी आज (मंगळवार) दिली.

बारामतीत ते पत्रकारांशी बोलत होते. आगामी निवडणुकीसाठी जिल्हा पोलिसांनी संपूर्ण तयारी केली असून, पुणे जिल्ह्यामध्ये 42 भरारी पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे. संपूर्ण जिल्ह्यामध्ये 13 ठिकाणी चोवीस तास सुरू राहणाऱ्या तपासणी नाक्यांची उभारणी करण्यात आली आहे.

दरम्यान, नाकाबंदीच्या काळात आत्तापर्यंत पोलिसांनी पाच पिस्तूल व दोन रायफलींसह 23 घातक शस्त्रे जप्त केली आहेत. यासंदर्भात आठ गुन्ह्यांची नोंद झाली आहे. तीन हजारपेक्षा अधिक लोकांवर 107 व 110 कलमान्वये तर 144 कलमान्वये एक हजार जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई केल्याचे त्यांनी सांगितले.

दोन टप्प्यात होणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीसाठी 2300 पोलिस कर्मचारी तैनात असतील. याशिवाय पोलिसांच्या मदतीला गृहरक्षक दल तसेच राज्य राखीव दलासह केंद्रीय राखीव दलाच्या तुकड्या तैनात करण्यात येणार असल्याचे ते म्हणाले.

मतदानाची प्रक्रिया निर्भयपणे व शांततेत पार पडावी, यासाठी संवेदनशील व अतिसंवेदनशील मतदान केंद्रांवर अतिरिक्त पोलिस बंदोबस्त पुरविले जाणार असून, वरिष्ठ पोलिस अधिकारी याचे समन्वय करणार आहेत. मतदानाच्या प्रक्रियेत अडथळा निर्माण करणाऱ्या समाजकंटकांवर कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल, असा इशाराही पाटील यांनी दिला. 

विक्रमी कारवाई

कोणत्याही निवडणुकीदरम्यान एकाच वेळेस इतक्या मोठ्या प्रमाणात वेगवेगळ्या प्रकारची प्रतिबंधात्मक कारवाई करण्याची ही पहिलीच वेळ आहे. एक हजार जणांसह आणखीही काही समाजकंटकांवर आगामी काळात सात दिवस तडीपारीची कारवाई होईल, असे त्यांनी नमूद केले.

Web Title: we will take action of Tadipar against thousand Peoples says Sandip Patil