पुढील दोन दिवसांमध्ये तापमानाचा पारा घसरणार;हवामान खात्याचा अंदाज

सकाळ वृत्तसेवा
Monday, 25 January 2021

पुण्यात किमान तापमानाचा पारा१३अंश सेल्सिअसपर्यंत कमी होईल. शिवाजीनगर येथे किमान तापमानाचा पारा रविवारी सकाळी साडेआठपर्यंत१५.१अंश सेल्सिअस नोंदला गेला.सरासरीपेक्षा चार अंश सेल्सिअसने तापमान वाढले होते

पुणे - शहर आणि परिसरात प्रजासत्ताक दिनी (ता. २६) हवामान कोरडे राहण्याची शक्यता असून, पुण्यात किमान तापमानाचा पारा १३ अंश सेल्सिअसपर्यंत कमी होईल. शिवाजीनगर येथे किमान तापमानाचा पारा रविवारी सकाळी साडेआठपर्यंत १५.१ अंश सेल्सिअस नोंदला गेला. सरासरीपेक्षा चार अंश सेल्सिअसने हे तापमान वाढले होते. मात्र, पुढील दोन दिवसांमध्ये किमान तापमानाचा पारा दोन अंश सेल्सिअसने घसरेल, असा अंदाज हवामान खात्याने रविवारी दिला. 

पुण्यात कमाल तापमानाचा पारा सरासरीपेक्षा २.२ अंश सेल्सिअसने वाढून ३२.६ अंश सेल्सिअस नोंदला गेला. प्रजासत्ताक दिनी दर वर्षी थंडी असते. मात्र, या वर्षी हवामानात बदल झाल्याचे निरीक्षण हवामान शास्त्रज्ञांनी नोंदविले. 

पुण्यात मटणाचे दर का वाढले?; जाणून घ्या 4 प्रमुख कारणे​

मराठवाडा ते बिहार दरम्यान कमी दाबाचा पट्टा आहे. पुढील दोन ते तीन दिवसांत मराठवाडा व विदर्भातील अनेक भागांत वातावरणात बदल होतील. त्यामुळे येत्या गुरुवारी (ता. २८) मराठवाडा आणि विदर्भाच्या काही भागात पावसाच्या हलक्या सरी पडतील. विशेषतः पूर्व विदर्भातील भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर व वर्धा या जिल्ह्यांमध्ये पावसाच्या सरी हजेरी लावतील. 

पुण्यात १३ तृतीयपंथीयांना अटक; सिग्नलवर वाहनचालकांना धमकावून उकळायचे पैसे​

अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरात गेल्या सहा महिन्यांपासून चक्रीवादळाची मालिका सुरू आहे. त्याचा थेट परिणाम राज्यातील वातावरणावर होत आहे. सध्या थंडी कमी-जास्त होत आहे. काश्मीर खोऱ्यात सुरू असलेल्या जोरदार हिमवृष्टीमुळे उत्तर भारतातील थंडीची लाट निर्माण झाली आहे. उत्तर भारतातून थंड आणि कोरडे वारे महाराष्ट्राच्या दिशेने वाहू लागतील. त्यामुळे पुढील दोन दिवसांमध्ये देशात रविवारी (ता. २४) झारखंड, छत्तीसगड आणि विदर्भात कमी दाबाचा पट्टा, तर उत्तर मध्य महाराष्ट्रात चक्रीय वाऱ्यासाठी पोषक वातावरण तयार होत आहे. यामुळे गुरुवारपासून वातावरणात आणखी बदल होतील. सध्या राज्यातील मध्य महाराष्ट्र व विदर्भातील काही भागांत थंडी असून, किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत एक अंश सेल्सिअसने घट झाली आहे. येत्या दोन ते तीन दिवस ही थंडी काही प्रमाणात राहणार आहे, असे हवामान खात्यातर्फे स्पष्ट करण्यात आले. 

धक्कादायक! टेकडीवर जॉगिंगसाठी गेलेल्या पुणेकरांच्या 9 गाड्या फोडल्या​


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Weather forecast temperature decrease in the next two days