हवामान संदेश मातृभाषेतून

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 21 एप्रिल 2018

पुणे - देशातील शेतकऱ्यांना हवामान अंदाजाचा संदेश (एसएमएस) मोबाईलवरून त्यांच्या मातृभाषेतून देण्याचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प भारतीय हवामान खात्याने (आयएमडी) हाती घेतला आहे. येत्या जूनपासून याची देशात सुरवात होणार आहे, अशी माहिती पृथ्वी विज्ञान मंत्रालयाचे सचिव डॉ. माधवन नायर राजीवन यांनी गुरुवारी येथे स्पष्ट केली. 

पुणे - देशातील शेतकऱ्यांना हवामान अंदाजाचा संदेश (एसएमएस) मोबाईलवरून त्यांच्या मातृभाषेतून देण्याचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प भारतीय हवामान खात्याने (आयएमडी) हाती घेतला आहे. येत्या जूनपासून याची देशात सुरवात होणार आहे, अशी माहिती पृथ्वी विज्ञान मंत्रालयाचे सचिव डॉ. माधवन नायर राजीवन यांनी गुरुवारी येथे स्पष्ट केली. 

ते म्हणाले, ‘‘शेतकऱ्यांना एसएमएस करण्यासाठी केंद्रीय कृषी संशोधन परिषद (आयसीएआर) यांच्याशी समन्वय करार करण्यात आला आहे. त्यांचे देशातील प्रत्येक जिल्ह्यात कृषी विज्ञान केंद्र आहे. या केंद्राच्या आवारात आता आयएमडीचे कार्यालय सुरू करणार आहे. त्यासाठी केंद्रातर्फे जागा उपलब्ध करून दिली जाईल. तेथे आयएमडीचे दोन हवामान तज्ज्ञ आणि एक सहायक यांची नियुक्ती करणार आहे. या अधिकाऱ्यांचे वेतन आयएमडीतर्फे दिले जाणार आहे. आयएमडीचे अधिकारी जिल्ह्यातील कृषी अधिकाऱ्यांच्या सातत्याने संपर्कात राहतील. हवामान खात्याचा अंदाज कृषी विज्ञान केंद्रापर्यंत पोचविला जाईल. त्यांच्या माध्यमातून हवामान अंदाज जिल्ह्यातील शेतकऱ्यांपर्यंत पोचविण्याचा प्रकल्प हाती घेण्यात आला आहे.’’ 

केंद्रीय कृषी खात्याच्या कृषी पोर्टलतर्फे सध्या शेतकऱ्यांना हवामान अंदाजाचे एसएमएस पाठविले जात आहेत; पण त्याला मर्यादा असल्याचे स्पष्ट झाले आहे. जिल्ह्यातील एक लाखापेक्षा जास्त शेतकऱ्यांना सध्याच्या यंत्रणेतून एसएमएस पाठविता येत नाहीत. त्यामुळे आयएमडी आता स्वतःची एसएमएस सुविधा विकसित करत आहे. त्यासाठी देशभरातील शेतकऱ्यांचे मोबाईल क्रमांक संकलित करण्यात येत आहेत.

त्यासाठी वेगवेगळ्या राज्यांतील मुख्यमंत्र्यांची मदत घेण्यात आली आहे. पृथ्वी विज्ञानमंत्री यांनी याबाबतचे पत्र राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना दिले आहे. त्याला आता राज्यांकडून प्रतिसाद मिळत आहे, अशी माहिती त्यांनी दिली.

येत्या जूनपासून ही सुविधा कार्यान्वित करण्यात येणार आहे. देशातील सुमारे चाळीस कोटी म्हणजे देशभरातील निम्म्या शेतकऱ्यांना त्यांच्या मातृभाषेत एसएमएसद्वारे हवामान संदेश आता मिळणार आहे.
- डॉ. माधवन नायर राजीवन, सचिव, पृथ्वी विज्ञान मंत्रालय

Web Title: Weather message in mother tongue