जुन्नर तालुक्यात होणार हवामान केंद्र - सुहास दिवसे

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 5 नोव्हेंबर 2019

शेतकऱ्यांनी मांडल्या व्यथा
बुरशी व कीटकनाशकांच्या किमतीत मोठी वाढ झाल्याने भांडवली खर्च वाढला आहे. द्राक्षाला मिळणारा भाव व खते, औषधे यासाठी होणारा भांडवली खर्च, प्रतिकूल हवामान याचा मेळ बसत नसल्याने द्राक्ष उत्पादक अडचणीत सापडला आहे. शासनाने बुरशी व कीटकनाशकांच्या किमती नियंत्रित ठेवण्यासाठी उपाययोजना करावी, अशी मागणी या वेळी शेतकऱ्यांनी केली.

नारायणगाव - जुन्नर तालुका निर्यातक्षम द्राक्ष उत्पादनात अग्रेसर आहे. हवामानातील बदलाची माहिती आगाऊ मिळावी, यासाठी तालुक्‍यात दहा किलोमीटर अंतरावर एक हवामान केंद्र उभारण्याचा पायलट प्रोजेक्‍ट राबविण्यात येईल, अशी ग्वाही कृषी आयुक्त सुहास दिवसे यांनी दिले.

अवेळी पावसामुळे तालुक्‍यात द्राक्ष, डाळिंब, सोयाबीन, भात व भाजीपाला पिकांचे, फूलशेतीचे मोठे नुकसान झाले आहे. कृषी आयुक्त दिवसे, विभागीय कृषी सहसंचालक दिलीप झेंडे, विभागीय कृषी अधिकारी संगीता माने, तालुका कृषी अधिकारी सतीश शिरसाट यांनी आज दुपारी पिंपळवंडी परिसरातील द्राक्ष, सोयाबीन शेतीच्या नुकसानीची पाहणी केली. 

नैसर्गिक आपत्तीचा सामना करण्यासाठी शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी आहे. नुकसानीचे पंचनामे केले जातील. नुकसान भरपाईपासून शेतकरी वंचित राहणार नाहीत अशी काळजी घेतली जाईल, असे दिवसे यांनी सांगितले. या वेळी कृषी अधिकारी बापू रोकडे, आर. एन. गाडेकर, प्रमोद बनकर, कृषी विज्ञान केंद्राचे डॉ. भरत टेमकर, द्राक्ष उत्पादक प्रकाश वाघ, संजय वाघ आदी उपस्थित होते.

दिवसे म्हणाले, ‘‘अवेळी पावसाचा सर्वाधिक फटका द्राक्ष पिकांना बसला आहे. काही बागा वाचल्या तरी गुणवत्तेवर परिणाम होणार असल्याने निर्यातीत घट होणार आहे. ग्लोबल वॉर्मिंगचा सामना शेतकऱ्यांना पुढील काळातसुद्धा करावा लागणार आहे. शेतीसमोरील धोके विचारात घेऊन पिके वाचवण्यासाठी पुढील काळात शेतकऱ्यांनी सतर्क राहणे आवश्‍यक आहे. शेतकऱ्यांनी दरवर्षी हवामानावर आधारित पीक विमा काढणे आवश्‍यक आहे. ज्या द्राक्ष बागांची छाटणी उशिरा झाली आहे अशा शेतकऱ्यांनी सात नोव्हेंबरपूर्वी द्राक्ष बागांचा पीक विमा काढून घ्यावा.’’


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Weather station in junnar tahsil suhas divase