तरुणाईसाठी वेब सीरिजचा नवा फंडा

सुवर्णा चव्हाण
सोमवार, 9 एप्रिल 2018

पुणे - स्वप्नीलने वेब सीरिज शूट केली अन्‌ ती यू-ट्यूबवर अपलोड केली... अवघ्या दोन दिवसांत सीरिज पाहणाऱ्यांची संख्या वीस हजारांवर पोचली... सध्या वेब सीरिज तयार करण्याचा ट्रेंड तरुणांमध्ये वाढला आहे. त्याद्वारे त्यांचे अर्थार्जनही होत आहे. हिंदी- इंग्रजी भाषेच्या तुलनेत मराठीमध्ये वेब सीरिज तयार करण्याचे प्रमाण कमी असूनही तरुणांना यातून पैसा कमावण्याचा चांगला मार्ग मिळाला आहे. वेब सीरिज दरम्यान दाखविल्या जाणाऱ्या जाहिराती आणि कंपन्यांच्या स्पॉन्सरशिपमुळे वेब सीरिज तयार करणाऱ्या तरुणांना आर्थिक फायदा होत आहे. तसेच, वेब सीरिजच्या यू-ट्यूबवरील व्ह्यूअरशिपमधूनही त्यांना पैसे मिळत आहेत.

पुणे - स्वप्नीलने वेब सीरिज शूट केली अन्‌ ती यू-ट्यूबवर अपलोड केली... अवघ्या दोन दिवसांत सीरिज पाहणाऱ्यांची संख्या वीस हजारांवर पोचली... सध्या वेब सीरिज तयार करण्याचा ट्रेंड तरुणांमध्ये वाढला आहे. त्याद्वारे त्यांचे अर्थार्जनही होत आहे. हिंदी- इंग्रजी भाषेच्या तुलनेत मराठीमध्ये वेब सीरिज तयार करण्याचे प्रमाण कमी असूनही तरुणांना यातून पैसा कमावण्याचा चांगला मार्ग मिळाला आहे. वेब सीरिज दरम्यान दाखविल्या जाणाऱ्या जाहिराती आणि कंपन्यांच्या स्पॉन्सरशिपमुळे वेब सीरिज तयार करणाऱ्या तरुणांना आर्थिक फायदा होत आहे. तसेच, वेब सीरिजच्या यू-ट्यूबवरील व्ह्यूअरशिपमधूनही त्यांना पैसे मिळत आहेत. त्यामुळे वेब सीरिज तयार करणाऱ्यांसाठी सध्या ‘अच्छे दिन’ आले आहेत. 

वेब सीरिज तयार करण्याचा ट्रेंड गेल्या दोन वर्षांपासून वाढला आहे. मराठीमध्ये वर्षातून किमान अंदाजे ६० ते ७० वेब सीरिज तयार होत आहेत. उत्साही तरुणाई गंभीर विषयांवर सीरिज तयार करत आहे. तरुणांनी एकांकिका, शॉर्टफिल्म अन्‌ नाटकांच्या जोडीला आता वेब सीरिज तयार करण्यावर भर दिला आहे. या माध्यमातून तरुणच तरुणांमधील गंभीर विषयांवर प्रकाशझोत टाकत आहेत. यू-ट्यूब आणि फेसबुकवर या वेब सीरिज पाहता येतात. 

वेब सीरिजमध्ये जाहिरात दाखविण्यासाठी वेब सीरिजला विविध कंपन्यांकडून स्पॉन्सरशिप दिली जाते. कंपन्यांच्या प्रॉडक्‍टची जाहिरातही दाखविण्यात येते. तसेच, सीरिजमधील काही दृश्‍यांमध्ये प्रॉडक्‍टची जाहिरात करणाऱ्या कंटेटचा समावेश असतो. त्याशिवाय यू-ट्यूबवर, सीरिजच्या चॅनेलवर व्ह्यूअरशिप वाढली तर यू-ट्यूबकडून सीरिज दरम्यान जाहिराती दाखवल्या जातात. जाहिरातींद्वारे मिळणारी विशिष्ट रक्कम सीरिज तयार करणाऱ्यांना दिली जाते. 

काय आहे वेब सीरिज? 
दूरचित्रवाणीवरील मालिकांप्रमाणे या वेब सीरिज शूट केल्या जातात. ५ ते ३५ मिनिटांच्या या सीरिजमध्ये विविध विषय हाताळले जातात.  एका कथानकाभोवती फिरणाऱ्या या सीरिजमधून कलाकारांना नवे व्यासपीठ मिळत आहे. एका वेब सीरिजचे कमीत-कमी तीन ते दहा भाग यू-ट्यूब किंवा फेसबुकवर दाखवले जातात. 

ज्वलंत विषयांवर प्रकाश... 
वेब सीरिजमध्ये सामाजिक विषयही हाताळले जात आहेत. थ्रिलर, रोमॅंटिक आणि विनोदी कथानकावर आधारित वेब सीरिजही यू-ट्यूबवर पाहायला मिळतील. तरुणांमधील ताणतणाव, करिअर, प्रेम, आई-वडिलांशी असलेले नातेसंबंध आदी विषयांवरही वेब सीरिज तयार केल्या जात आहेत.

कशा तयार होतात? 
प्रथम वेब सीरिजची संहिता तयार केली जाते, त्यानुसार कलाकारांची निवड केली जाते. कॅमेरामन, कलाकार, लेखक, दिग्दर्शक आणि शूटिंगसाठीच्या लोकेशनची जुळवाजुळव झाल्यानंतर या वेब सीरिजचे शूटिंग केले जाते. त्यानंतर ती यूट्यूबवर शेअर केली जाते. हौशी तरुणांना सीरिज तयार करण्यासाठी २० ते ५० हजार रुपयांचा खर्च येत आहे. 

कशा पाहता येतील? 
वेब सीरिजचा एखादा भाग यू-ट्यूबवर दाखविण्यापूर्वी त्याची प्रसिद्धी केली जाते. वेब सीरिजच्या फेसबुक, इंस्टाग्राम, व्हॉट्‌सॲप आणि ट्विटरवरील अकाउंटवर त्याची प्रसिद्धी होते आणि वेब सीरिजची लिंक यावर शेअर केली जाते. त्या लिंकवर क्‍लिक केल्यास आपल्याला ती सीरिज पाहायला मिळेल. ऑफिशियल संकेतस्थळावरही ती पाहता येईल. 

वेब सीरिज पाहणे आणि तयार करणाऱ्यांमध्ये तरुणांची संख्या मोठी आहे. आम्ही तयार केलेल्या सीरिजला तरुणांचा चांगला प्रतिसाद मिळाला आहे. पटकथेपासून ते सीरिज शूट करण्यापर्यंतचे सर्व काम तरुणच करतात. 
- नितीन वाघ,  दिग्दर्शक, वेब सीरिज 

मी रोज वेब सीरिज पाहतो. त्यातील वेगवेगळे विषय खूपच चांगल्या रीतीने सादर केले जात असून, दूरचित्रवाणीच्या पलीकडे या वेब सीरिज खऱ्या अर्थाने प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहेत. 
- वृषभ जैन,  वेब सीरिज पाहणारा चाहता

Web Title: Web Series new funda for youth