संकेतस्थळ "हॅंग' झाल्याने इच्छुक अस्वस्थ 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 1 फेब्रुवारी 2017

पुणे - महापालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरणाऱ्या इच्छुकांना राज्य निवडणूक आयोगाचे संकेतस्थळ वारंवार "हॅंग' होत असल्याचा अनुभव मंगळवारी आला. त्यामुळे निवडणूक कार्यालयाने लेखी स्वरूपातच अर्ज स्वीकारावेत, अशी मागणी उमेदवार करीत आहेत. तर संकेतस्थळ सुमारे दोन तासच हॅंग होते, असे महापालिका प्रशासनाने स्पष्ट केले. 

पुणे - महापालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरणाऱ्या इच्छुकांना राज्य निवडणूक आयोगाचे संकेतस्थळ वारंवार "हॅंग' होत असल्याचा अनुभव मंगळवारी आला. त्यामुळे निवडणूक कार्यालयाने लेखी स्वरूपातच अर्ज स्वीकारावेत, अशी मागणी उमेदवार करीत आहेत. तर संकेतस्थळ सुमारे दोन तासच हॅंग होते, असे महापालिका प्रशासनाने स्पष्ट केले. 

महापालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी इच्छुकांना राज्य निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळावर नोंदणी करणे आवश्‍यक आहे. त्यावरील दहा पानांचा अर्ज भरून झाल्यावर त्याची प्रिंट काढून ती महापालिकेच्या क्षेत्रीय कार्यालयात सादर करायची आहे. मात्र संकेतस्थळ "हॅंग' असल्याचा अनुभव वारंवार येत असल्याचे इच्छुक उमेदवार मुश्‍ताक पटेल यांनी "सकाळ'शी बोलताना सांगितले. त्यामुळे अनेक इंटरनेट कॅफेवर गर्दी झाली होती. सकाळी अकरापासून सायंकाळपर्यंत असा अनुभव येत असल्याचे त्यांनी सांगितले. 

दहा पानांचा निवडणूक अर्ज भरताना चार पानांवरील माहिती नोंदविल्यानंतर पुढे संकेतस्थळ "हॅंग' होत असल्याचा अनुभव इच्छुक संदीप खर्डेकर यांनाही आला. ऑनलाइन पद्धतीने अर्ज करताना पुन्हा अर्जाची प्रिंट देण्याचा आग्रह का? ही पद्धत त्रासदायक असल्यामुळे निवडणूक आयोगाने उमेदवारांना प्रिंट आउट उपलब्ध करून द्यावी, अशी मागणीही त्यांनी केली. 

वेबसाइट "हॅंग' झाल्यामुळे एखाद्या उमेदवाराला अर्ज भरता आला नाही, तर त्याची संधी जाऊ शकते; तसेच मुहूर्तावर अर्ज भरणेही त्यामुळे शक्‍य होत नसल्याचे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शहरप्रमुख हेमंत संभूस यांनी नमूद केले. 

अर्ज भरण्यासाठी रोज 24 तास 
या बाबत महापालिकेचे निवडणूक अधिकारी सतीश कुलकर्णी म्हणाले, ""मंगळवारी दुपारी दोन तास संकेतस्थळ "हॅंग' झाले होते. मात्र सायंकाळी चार वाजल्यापासून ते सुरळीत झाले. तसेच उमेदवारांना शुक्रवारपर्यंत अर्ज भरता येणार आहेत. त्यासाठी दररोज 24 तास उपलब्ध आहेत. राज्य निवडणूक आयोगाने दिलेल्या आदेशाची राज्यात सर्वत्र अंमलबजावणी होत असून, त्यानुसारच पुण्यातही कामकाज सुरू आहे.''

Web Title: Website hang candidate upset