आठवडे बाजारामुळे वाहतुकीचा बोजवारा

आठवडे बाजारामुळे वाहतुकीचा बोजवारा

पिंपरी - सुटी असल्याने रविवारचा दिवस सर्वांनाच हवाहवासा वाटतो. मात्र डांगे चौकात भरणाऱ्या आठवडे बाजारामुळे येथील नागरिकांना रविवार नावडीचा वाटत आहे. चौक आणि आसपासच्या परिसरात जवळपास दीड हजार फेरीवाले असल्याने चौकातील वाहतुकीचा विचार न केलेलाच बरा.


डांगे चौकातील वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी महापालिकेने छत्रपती शिवाजी महाराज उड्डाण पूल उभारला. यामुळे काळेवाडी फाट्याकडून पुनावळे, रावेत तसेच एक्‍स्प्रेसवेकडे जाणाऱ्या वाहनांची समस्या सुटली. मात्र चिंचवड, वाकडकडून येणाऱ्या वाहनांना येथील वाहतूक कोंडीचा सामना करावाच लागतो.

दीड हजार फेरीवाले
इतर दिवशी डांगे चौक आणि आसपासच्या परिसरात साधारणतः दीडशे फेरीवाले असतात. मात्र रविवारी जवळपास दीड हजार फेरीवाले आठवडे बाजारासाठी येतात. यामुळे रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होते. विशेषतः रावेतकडे जाणाऱ्या मार्गावर फेरीवाले पदपथावर व्यवसाय करतात. शेअर रिक्षा रस्त्यावर उभ्या केल्या जातात. यामुळे जेमतेम एक वाहन जाऊ शकेल, एवढीच जाग शिल्लक असते.

सोसायट्यांमध्ये पार्किंग
बाजारासाठी येणाऱ्यांपैकी काही जण आपल्या दुचाकी येथील सोसायट्यांच्या आवारात पार्क करतात. यावरूनही अनेकदा भांडणे होतात. तसेच सोसायटीच्या आवारातून आपली वाहने रस्त्यावर आणण्यासाठी येथील रहिवाशांना तारेवरची कसरत करावी लागते. त्यातूनही एखाद्याला धक्‍का लागलाच तर मग भांडणे ही ठरलेली आहेत.

ध्वनी प्रदूषणातही वाढ
एरवी गोंगाट असलेल्या डांगे चौक परिसरात रविवारी ध्वनिप्रदूषणात मोठ्या प्रमाणात वाढ होते. आपल्याकडील मालावर ग्राहकांचे लक्ष जावे, यासाठी ते मोठमोठ्याने ओरडत असतात. तसेच वाहनचालकांना वाट न मिळाल्यामुळे तेही हॉर्न वाजवतात. यामुळे येथील ध्वनिप्रदूषणात मोठ्या प्रमाणात वाढ होते.

रस्ता दुभाजकांत फेरीवाले
चिंचवडकडे येणाऱ्या रस्त्यावर सात फेरीवाल्यांच्या गाड्या होत्या. त्यामुळे निम्म्याहून अधिक रस्ता व्यापला गेला होता. तसेच येथील रस्ता दुभाजकावरही फेरीवाल्यांनी आपले बस्तान बसविले आहे.
काळेवाडीकडे जाणाऱ्या मार्गावर पुलाखाली "नो-पार्किंग' असूनही टेंपोचालक सर्रास आपली वाहने उभी करतात. चौकात असलेले पोलिसही याकडे दुर्लक्ष करतात.

कचऱ्याची समस्या
रविवारी बाजार झाल्यानंतर येथील फेरीवाले आपल्याकडील भाज्यांचा कचरा जागेवरच टाकून निघून जातात. दुसऱ्या दिवशी सडलेल्या भाज्यांची दुर्गंधी मोठ्या प्रमाणात पसरते. याबाबत स्थानिकांनी अनेकदा तक्रार करूनही काहीच कारवाई होत नाही.

महापालिकेची कारवाई
महापालिकेचे तत्कालीन आयुक्‍त डॉ. श्रीकर परदेशी यांनी उड्डाण पुलाच्या उभारणीच्या वेळी येथील फेरीवाल्यांवर कारवाई केली होती. मात्र त्या वेळी राजकीय नेत्यांनी आंदोलन केले होते. तीन महिन्यांपूर्वीही महापालिकेच्या "ब' क्षेत्रीय कार्यालयाने काही वेळा कारवाई केली. ही कारवाई अशीच सुरू राहणार असल्याचे सांगितले.

महापालिकेने सलग सहा रविवारी येथील आठवडे बाजारातील फेरीवाल्यांवर कारवाई केली होती. दिवाळीमुळे कारवाईमध्ये खंड पडला. मात्र पुढील रविवारपासून पुन्हा कारवाईला सुरवात केली जाणार आहे.
सुभाष माछरे, सहायक आयुक्‍त, ब क्षेत्रीय अधिकारी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com