नामवंत कंपन्यांकडून वजनात घोळ

महेंद्र बडदे - सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 30 डिसेंबर 2016

पुणे - "पॅकिंग' केलेल्या वस्तूंबाबत वजन-मापे कायद्यानुसार (वैधमापनशास्त्र) टाकण्यात आलेल्या नियमांचे नामवंत कंपन्यांकडून पालन होत नाही. या नियमात वस्तूचे "पॅकिंग' किती वजनाचे असावे, असे नमूद केलेले आहे. परंतु, अनेक कंपन्या प्रमाणित वजनाचे "पॅकिंग' करीत नसल्याने ग्राहकांची फसवणूक होत आहे.

पुणे - "पॅकिंग' केलेल्या वस्तूंबाबत वजन-मापे कायद्यानुसार (वैधमापनशास्त्र) टाकण्यात आलेल्या नियमांचे नामवंत कंपन्यांकडून पालन होत नाही. या नियमात वस्तूचे "पॅकिंग' किती वजनाचे असावे, असे नमूद केलेले आहे. परंतु, अनेक कंपन्या प्रमाणित वजनाचे "पॅकिंग' करीत नसल्याने ग्राहकांची फसवणूक होत आहे.

आधुनिक जीवनशैलीमुळे बहुतेक जीवनावश्‍यक आणि दैनंदिन वापराच्या वस्तू या "पॅकिंग' स्वरूपात विकल्या जात आहेत. साबण, बिस्किटे, नुडल्स, जॅम अशा अनेक वस्तूंबरोबरच धान्यदेखील "पॅकिंग' मध्ये विकले जात आहे. नामवंत कंपन्यांप्रमाणेच छोट्या कंपन्यादेखील यात मागे राहिल्या नाहीत. आकर्षक "पॅकिंग' मधील विविध प्रकारच्या वस्तू ग्राहकांचे लक्ष वेधून घेतात. या "पॅकिंग'वर उत्पादनाचा दिवस, त्याची वापरण्याची अंतिम मुदत, कमाल किंमत (एमआरपी) याच प्रमाणे वजनही नमूद करण्याचे बंधन कायद्याने घातले आहे. ग्राहकांची फसवणूक होऊ नये, त्यांना योग्य वजनाच्या वस्तू मिळाव्यात, यासाठी वैधमापनशास्त्र नियमानुसार वस्तूनिहाय "पॅकिंग'चे वजन ठरविण्यात आले आहे. उदाहरणार्थ लहान मुलांचे खाद्य हे 25 ग्रॅम, 50 ग्रॅम, 100 ग्रॅम, 200 ग्रॅम, 300 ग्रॅम, 350 ग्रॅम अशा वजनाच्या "पॅकिंग' मध्ये विकण्याचे बंधन आहे. याच प्रमाणे बिस्कीट, बटर, कडधान्य आणि डाळी, चहा, कॉफी, खाद्यतेल, वनस्पती तूप, दूध पावडर, डिटर्जंट पावडर, साबण, रवा, मैदा, आटा अशा प्रकारच्या विविध वस्तूंच्या पॅकिंगच्या वजनाचे प्रमाण या नियमात निश्‍चित केले आहे. या नियमांकडे उत्पादक कंपन्यांकडून दुर्लक्ष केले जात आहे.

याबाबत ग्राहक पेठेचे सूर्यकांत पाठक म्हणाले, ""नियमांचे पालन न करणे ही ग्राहकांची फसवणूकच आहे. निश्‍चित वजनाच्या प्रमाणाऐवजी म्हणजे उदा. 50 ग्रॅम ऐवजी 53 ग्रॅम वजन नमूद करणे असे प्रकार होत आहेत. एखाद्या वस्तूचे "पॅकिंग' हे एक किलो वजनाच्या आकाराएवढे दिसते; पण त्यात 950 ग्रॅम वजनाचा माल असतो. ते ग्राहकांच्या लक्षात येत नाही. याबाबत जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेच्या बैठकीत चार ते पाच वेळा मी विषय मांडला आहे. त्याची अद्याप दखल घेतली नाही.''
यासंबंधी वैधमापनशास्त्र विभागाचे सहायक नियंत्रक डी. महाजन म्हणाले, ""दहा रुपये किंमत असलेल्या कोणत्याही वस्तूच्या "पॅकिंग'संदर्भात वजनाचे प्रमाण निश्‍चित केलेले नाही. त्यांना या नियमातून वगळण्यात आले आहे. या प्रकारे नियमाचा भंग होत असेल, तर निश्‍चितच कायदेशीर बाबी तपासून कारवाई केली जाईल.''

एमआरपी ही उत्पादन खर्चावर आधारित हवी
""कायद्याने वेष्टणावर विक्रीची कमाल किंमत छापण्याची सक्ती केली आहे; परंतु ही किंमत किती असावी, याचे सूत्र ठरविले गेले नाही. त्यामुळे उत्पादन खर्चावर आधारित ही किंमत असली पाहिजे. कमी उत्पादन खर्च असूनही अनेक वस्तू "एमआरपी'च्या नावाखाली जास्त किमतीत विकल्या जात आहेत. त्यामुळे वेष्टणावर उत्पादन खर्चही छापला पाहिजे,'' अशी मागणी सूर्यकांत पाठक यांनी केली.

Web Title: Weight jumble from renowned companies