#Wari 2019 : ज्ञानेश्वरांच्या पालखीचे भोसरीत जल्लोषात स्वागत

PNE19P67604.jpg
PNE19P67604.jpg

भोसरी : जीवाचिया जीवा प्रेमभावाचिया भावा | तुज वाचूनि केशवा अनु नावडे ||जीवे अनुसरलिये अजून का नये | वेगी आणा तो सये प्राण माझा || अशा भावनेने पांडुरंगाच्या भेटीला अतुर झालेल्या संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्याचे भोसरीतील मॅगझिन चौकात जल्लोषात स्वागत करण्यात आले. पालखी सोहळ्यात वारकरी भगवी पताका फडकावित मुखी विठुनामाचा गजर करत पालखी सोहळ्यात सहभागी झाले होते.

संतश्रेष्ट ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचे मॅगझिन चौकात आगमन होताच माऊली-माऊलीच्या जयघोषाने आसमंत दुमदुमून गेला. पालखीच्या दर्शनाने भारावलेल्या भाविकाद्वारे उत्स्फूर्तपणे टाळ्या वाजविण्यात आल्या. वैष्णवां सोबत काही पाऊले चालत पंढरीच्या वाटेवरील वारकरी असल्याचा अनुभव अबालवृध्दांनी घेतला. पालखीच्या दर्शनाचे पुण्य लाभल्याचे भाव भाविकांच्या चेहऱ्यावर उमटले. 

आळंदीहून मार्गस्थ संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांची पालखी वडमुखवाडी येथील थोरल्या पादुका मंदिरात सकाळी आठ वाजता आगमन झाले. देवस्थान ट्रस्टच्या वतीने फुलांच्या व रांगोळीच्या पायघड्या घालून “श्रीं”च्या पालखीचे स्वागत करण्यात आले. ट्रस्टच्या वतीने संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या पादुकांना दही दुधाचा अभिषेक करण्यात आला. थोरल्या पादुका ट्रस्टचे अध्यक्ष ऍड. विष्णू तपकीर व सुनिता तपकीर यांच्या हस्ते महापूजा व आरती करण्यात आली. पालखी सोहळ्याचे मालक बाळासाहेब आरफळकर यांना ट्रस्टच्या वतीने शाल व श्रीफळ देऊन सन्मानित करण्यात आले. या वेळी माजी महापौर नितीन काळजे, नगरसेविका निर्मल गायकवाड, अभय टिळक, विकास ढगे, रवींद्र गायकवाड, मनोहर भोसले चोपदार राजाबाऊ रंधवे व भाविक मोठ्या प्रमाणत उपस्थित होते. थोरल्या पादुका मंदिरातून विधिवत पूजेनंतर सकाळी सव्वाआठ वाजता पालखी पुढे मॅगझिन चौकाकडे मार्गस्थ झाली.

सकाळी नऊच्या सुमारास पालखीचे आळंदी रोड येथील मॅगझिन चौकात आगमन झाले. डोक्यावर तुळशी वृंदावन अन् मुखाने हरीनामाचा गजर करणाऱ्या महिला, कपाळावर बुक्का, अष्टगंध लावून मार्गस्थ झालेल्या वैष्णवांकडून निरंतर सुरू असणारा माउली माउलीचा गजर, विणेकरी, टाळकऱ्यांचा ओसंडून वाहत होता. उत्साहाने भक्तीमय अन् उल्हासपूर्ण वातारणातही वारकरी बांधवांकडून दिला जाणारा शिस्तीचा परिचय अशा भारावलेल्या वातावरणात पालखी सोहळा मॅगझिन चौकात येऊन विसावला. महानगरपालिका आणि विविध संस्थांद्वारे पालखी सोहळ्याचे स्वागत करण्यात आले. टाळ्यांच सोहळा नेत्रांमध्ये साठविण्यासाठी पंचक्रोशीतील भाविकांनि मोठी गर्दी केली होती. 


पिंपरी चिंचवड महापालिकेच्यावतीने महापौर राहुल जाधव यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून सोहळ्याचे स्वागत करण्यात आले. या वेळी आमदार महेश लांडगे, माजी आमदार विलास लांडे, आयुक्त श्रावण हर्डीकर, स्थायी समिती सभापती विलास मडीगेरी, नगरसेवक सागर गवळी, विक्रांत लांडे, रवी लांडगे , नगरसेविका सोनाली गव्हाणे, नम्रता लोंढे, भिमाताई फुगे, प्रियांका बारसे, क्षेत्रीय अधिकारी श्रीनिवास दांगट. अण्णा बोदडे तसेच महापालिकेतील अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्याने उपस्थित होते. 
महापौर राहुल जाधव, विलास मडिगिरी यांच्या हस्ते सोहळ्यातील दिंडी प्रमुखांना पखवाज भेट देऊन स्वागत करण्यात आले. संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महराजांची पालखी सोहळा मॅगझिन चौकातून पुणे येथे पुढील मुकामासाठी मार्गस्थ झाला.
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com