#saathchal मालींच्या पालखीचे जल्लोषात स्वागत 

संजय बेंडे 
रविवार, 8 जुलै 2018

भोसरी : पावसाची रिमझिम बरसात... मुखी हरिनामाचा जयघोष...टाळ मृदंगाचा गजर...हाती वैष्णवाची पताका... पुरुषांच्या उराशी ज्ञानेश्वरी, तर महिलांच्या डोक्‍यावर तुळस...आणि मनी पांडुरंगाच्या भेटीची ओढ...भाविकांची पुढे पडणारी पाऊले...अशा भक्तिमय वातावरणात संतश्रेष्ठ ज्ञानेश्‍वर महाराजांच्या पालखी सोहळ्याचे उद्योगनगरीत जल्लोषात स्वागत करण्यात आले. 

भोसरी : पावसाची रिमझिम बरसात... मुखी हरिनामाचा जयघोष...टाळ मृदंगाचा गजर...हाती वैष्णवाची पताका... पुरुषांच्या उराशी ज्ञानेश्वरी, तर महिलांच्या डोक्‍यावर तुळस...आणि मनी पांडुरंगाच्या भेटीची ओढ...भाविकांची पुढे पडणारी पाऊले...अशा भक्तिमय वातावरणात संतश्रेष्ठ ज्ञानेश्‍वर महाराजांच्या पालखी सोहळ्याचे उद्योगनगरीत जल्लोषात स्वागत करण्यात आले. 

आळंदीहून पालखीचे वडमुखवाडी येथील थोरल्या पादुका मंदिरात सकाळी सव्वाआठ वाजता आगमन झाले. देवस्थान ट्रस्टच्या वतीने रांगोळीच्या पायघड्या घालून स्वागत करण्यात आले. पादुकांना दहीदुधाचा अभिषेक करण्यात आला. ट्रस्टचे अध्यक्ष ऍड. विष्णू तपकीर यांच्या हस्ते महापूजा व आरती करण्यात आली. संस्थान प्रमुख विश्‍वस्त अभय टिळक, सोहळाप्रमुख ऍड. विकास ढगे, सोहळ्याचे मालक बाळासाहेब आरफळकर यांना सन्मानित करण्यात आले. या वेळी महापौर नितीन काळजे, नगरसेविका निर्मल गायकवाड, विनया तापकीर, रवींद्र भोसले उपस्थित होते. थोरल्या पादुका मंदिरातून विधिवत पूजेनंतर सकाळी पावणे नऊ वाजता पालखी पुढे मॅगझीन चौकाकडे मार्गस्थ झाली. 

भोसरीत आमदार महेश लांडगे यांनी पालखीचे सारथ्य करत वारकऱ्यांचे स्वागत केले. सकाळी दहा वाजता पालखीचे आळंदी रोड येथील मॅगझीन चौकात आगमन झाले. महापालिकेचा वतीने उभारण्यात आलेल्या स्वागत कक्षात पालखीचे स्वागत करण्यात आले. या वेळी महापालिकेचा वतीने महापौर नितीन काळजे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून सोहळ्याचे स्वागत करण्यात आले. या वेळी खासदार आढळराव पाटील, आमदार महेश लांडगे, आयुक्त श्रावण हर्डीकर, उपमहापौर शैलजा मोरे, अतिरिक्त आयुक्त दिलीप गाडवे, सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार, नगरसेवक विलास मडिगेरी, सागर गवळी, विक्रांत लांडे उपस्थित होते. महापालिकेतील कर्मचाऱ्यांनी या वेळी अभंग गात सोहळ्यात रंगत आणली. महापौर नितीन काळजे, आमदार महेश लांडगे यांच्या हस्ते सोहळ्यातील दिंडीप्रमुखांना पुष्पहार व ताडपत्री भेट देऊन स्वागत करण्यात आले. त्यानंतर पालखी सोहळा पुणे येथे मुक्‍कामासाठी मार्गस्थ झाला. 

चार टन बुंदीचे लाडू 
भोसरी येथील श्री संत ज्ञानेश्‍वर मित्र मंडळ व इंद्रायणी मंगल कार्यालयाद्वारे या वर्षीही संतश्रेष्ठ ज्ञानेश्‍वर महाराजांच्या पालखी सोहळ्यात वारकऱ्यांना चार टन बुंदीच्या लाडूंचा प्रसाद व पाच हजार पाण्याच्या बाटल्यांचे वाटप करण्यात आले. 

 

Web Title: Welcome to Mauli Palkhi