वाल्ह्यात माऊलींच्या पादुकांचे 'असे' झाले स्वागत...

किशोर कुदळे
मंगळवार, 30 जून 2020

टाळ मृदुंगाच्या गजरात 'पुंडलिक वरदे, हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम'च्या जयघोषात आषाढी एकादशीसाठी संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पादुका सजविलेल्या एसटीतून आळंदीतून पंढरपुरकडे दुपारी मार्गस्थ झाल्या.

वाल्हे (पुणे) : टाळ मृदुंगाच्या गजरात 'पुंडलिक वरदे, हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम'च्या जयघोषात आषाढी एकादशीसाठी संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पादुका सजविलेल्या एसटीतून आळंदीतून पंढरपुरकडे दुपारी मार्गस्थ झाल्या. एसटीचे वाल्मिकनगरीमध्ये आगमन होताच ग्रामस्थांसोबतच वरुणराजाने हजेरी लावली. रिमझिम पावसाच्या आगमनाबरोबरच सोशल डिस्टन्सिंगचे पालन करीत महामार्गाच्या कडेला उभे राहुन वाल्हेकरांनी फुलांच्या पायघड्या अंथरुन पुष्पवृष्टी करत विठूनामाचा जयघोषात मोठ्या जल्लोषात माऊलींच्या पादुकांचे स्वागत करत भावपुर्ण निरोप दिला.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

Wari 2020 : कोरोनाच्या पार्श्वभुमीवर शासनाने पालखी सोहळ्यातील पायी वारी रद्द केली. उद्या बुधवारी (दि.1) जुलै रोजी आषाढी एकादशी आहे. शासनाने केवळ वीस जणांच्या उपस्थितीत संस्थानला पंढरपूरकडे जाण्यास परवानगी दिली आहे. फुलांनी सजविलेल्या  एसटी बसमध्ये यंदा संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पादुका संस्थानचे अध्यक्ष, विश्वस्त आणि सेवेकरी अशा वीस जणांबरोबर पंढरपूरकडे मार्गस्थ झाल्या. आज दुपारी चार वाजता विठाईचे वाल्मिकनरीत आगमन झाले.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

यावेळी महामार्गाच्या दुतर्फा सोशल डिस्टन्सिंग
पाळत वाल्हेकरांनी रस्त्यावर अंथरलेल्या फुलांच्या पायघड्या बरोबरच पुष्पवृष्टी व विठूनामाचा जयघोष करत पालखीला भावपुर्ण निरोपही दिला. यावेळी सरपंच अमोल खवले, दत्तात्रय पवार, महादेव चव्हाण, भाऊसाहेब भोसले, सुनिल पवार, प्रा. संतोष नवले, ग्रामविकास अधिकारी बबनराव चखाले, गोरख कदम, हनुमंत पवार, सचिन जाधव, सुधाकर पवार आदी उपस्थित होते. यावेळी जेजुरीचे सहाय्यक पोलिस निरीक्षक अंकुश माने यांच्या मार्गदर्शनाखाली हनुमंत
गार्डी, बी. व्ही. जगदाळे आदींनी चोख बंदोबस्त ठेवला होता.
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Welcome to Mauli's Padukas in Walha