#SaathChal पालखी सोहळ्याचे लोणी काळभोरमध्ये स्वागत

palkhi at loni kalbhor
palkhi at loni kalbhor

लोणी काळभोर :
 पंढरीचे लागा वाटे । सखा भेटे विठ्ठल ॥
 संकल्प हे यावे फळा । कळवळा बहुतांचा ॥
 तुका ह्मणे होऊनि क्षमा । पुरुषोत्तमा अपराध ॥


अंगावर पावसाच्या धारा झेलत ज्ञानोबा-तुकोबारायांच्या जयघोषात विठ्ठल - रुक्‍मिणीच्या भेटीच्या ओढीने पंढरपूरकडे निघालेल्या लाखो वैष्णवांचा पालखी सोहळा सोमवारी (ता. ९) रात्री आठ वाजण्याच्या सुमारास ग्रामीण भागातील पहिल्या मुक्कामासाठी लोणी काळभोर येथील विठ्ठल मंदिरात विसावला.

मांजरी बुद्रुक येथील दुपारचा विसावा उरकून पालखी पाच वाजण्याच्या सुमारास कदमवाकवस्ती (ता. हवेली) गावाच्या हद्दीत कवडीपाट टोलनाका येथे पोचली. यावेळी कदमवाकवस्तीच्या सरपंच गौरी गायकवाड, पंचायत समिती सदस्य युगंधर काळभोर, माजी जिल्हा परिषद सदस्य राहुल पाचर्णे, जिल्हा राष्ट्रवादी कॉंग्रेसचे उपाध्यक्ष बाळासाहेब भोसले, माजी उपसरपंच देविदास कदम व त्यांच्या सहकाऱ्यांनी पालखी सोहळ्याचे स्वागत केले. यावेळी सोहळा प्रमुख शिवाजी मोरे व त्यांच्या सहकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी स्वानंद साधक मंडळ, छत्रपती ग्रुप व छावा ग्रुपच्या वतीने फराळ्याच्या पदार्थांचे व गुडदाणीचे वाटप करण्यात आले.

पालखी कदमवाकवस्ती ग्रामपंचायतीसमोर येताच साधना सहकारी बॅंकेचे संचालक सुभाष नरसिंग काळभोर, ग्रामपंचायत सदस्य ऋषिकेश काळभोर, सचिन दाभाडे, रमेश कोतवाल, नितीन लोखंडे, मंदाकिनी नामुगडे, राजश्री काळभोर, ग्रामविकास अधिकारी पी. एस. देसाई आदींनी पालखीचे स्वागत केले. दरम्यान वाकवस्ती येथे महाराष्ट्र केसरी राहुल काळभोर यांच्या वतीने वारकऱ्यांना साबण, ब्रश व इतर साहित्याचे वाटप केले. संभाजीनगर येथील भारतीय जनता पक्ष कार्यालयाजवळ भारतीय जनता पक्षाचे माजी कामगार आघाडीचे माजी जिल्हाध्यक्ष चित्तरंजन गायकवाड व त्यांच्या सहकाऱ्यांनी वारकऱ्यांना प्रधानमंत्री ग्रामीण कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रमातून बनविलेल्या सुमारे तीन हजार कापडी पिशव्यांचे वाटप केले. त्यानंतर पालखी सहा वाजण्याच्या सुमारास छोट्याशा विसाव्यासाठी लोणी स्टेशन येथे पोचली. याठिकाणी समर्थ रांगोळी पथक यांनी पालखी स्वागतासाठी आकर्षक रांगोळी काढली होती. यावेळी विश्वराज हॉस्पिटलने सर्व आजारांची तपासणी व मोफत औषधोपचार शिबीर घेतले. तसेच एकता तरुण मंडळ व एमआयटी कॉर्नर येथे लातूर अर्बन बँकेने वारकऱ्यांसाठी उपवासाच्या साहित्याचे वाटप केले. यावेळी माजी सरपंच नंदू काळभोर, सचिन काळभोर उपस्थित होते. 

लोणी स्टेशन येथील विसावा संपवून पालखी लोणी काळभोर ग्रामपंचायत हद्दीत पोचताच लोणी काळभोरच्या सरपंच वंदना काळभोर, उपसरपंच योगेश काळभोर, लोणी काळभोर विविध कार्यकारी संस्थेचे अध्यक्ष प्रशांत काळभोर, ग्रामपंचायत सदस्य अण्णासाहेब काळभोर, बाळासाहेब काळभोर, ग्रामविकास अधिकारी जे. एच. बोरावणे व त्यांच्या सहकाऱ्यांनी पालखीचे स्वागत केले. दत्तमंदिर चौक येथे शिवशक्ती भवन येथे माजी जिल्हा परिषद सदस्य विलास काळभोर यांच्या अध्यक्षतेखालील शिवशक्ती तरुण मित्र मंडळांच्या वतीने वारकऱ्यांसाठी खिचडी व केळींचे वाटप करण्यात आले.

लोणी गावात पालखीचे स्वागत अंबरनाथ देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष प्रकाश उद्धव काळभोर, साधना सहकारी बॅंकेचे संचालक सुभाष काशिनाथ काळभोर यांनी केले. दरम्यान निर्मलवारी महामार्ग सहप्रमुख विशाल वेदपाठक यांनी वाघोली येथील जेएसपीएम महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांसमवेत गावामध्ये निर्मल वारीसाठीजनजागृती केली. तसेच येथील पृथ्वीराज कपूर मेमोरिअल हायस्कूलच्या विद्यार्थ्यांच्या लेझीम, झांज पथक व कन्या प्रशालेच्या विद्यार्थींनीनी डोक्यावर तुळशीची रोपे घेवून वारीत सहभाग नोंदविला. दरम्यान रात्री आठ वाजता पालखी विठ्ठल मंदिरात पोचली. पालखीच्या दर्शनासाठी भाविकांनी रात्री उशिरापर्यंत रांगा लावून दर्शन घेतले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com