नियमबाह्य मान्यताप्राप्त शिक्षकांची बाजू ऐकणार 

संतोष शाळिग्राम - सकाळ वृत्तसेवा 
बुधवार, 4 जानेवारी 2017

पुणे - राज्यातील खासगी शाळांतील दोन हजार 818 शिक्षकांच्या वैयक्तिक मान्यता या शिक्षणाधिकारी आणि उपसंचालक यांनी नियमबाह्य पद्धतीने दिल्याचे शिक्षण आयुक्तालयाच्या तपासणीत पुढे आले आहे. आता अशा मान्यता घेणाऱ्या शिक्षकांना त्यांचे म्हणणे मांडण्यासाठी संधी दिली जाणार आहे. यासंबंधीचे आदेश शिक्षण आयुक्तांनी दिले आहेत. 

पुणे - राज्यातील खासगी शाळांतील दोन हजार 818 शिक्षकांच्या वैयक्तिक मान्यता या शिक्षणाधिकारी आणि उपसंचालक यांनी नियमबाह्य पद्धतीने दिल्याचे शिक्षण आयुक्तालयाच्या तपासणीत पुढे आले आहे. आता अशा मान्यता घेणाऱ्या शिक्षकांना त्यांचे म्हणणे मांडण्यासाठी संधी दिली जाणार आहे. यासंबंधीचे आदेश शिक्षण आयुक्तांनी दिले आहेत. 

राज्यभरात अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन पूर्ण झाले नसताना आणि कायदेशीर प्रक्रिया पूर्ण न करता शिक्षकांची भरती केल्याचे निदर्शनास आल्यानंतर तत्कालीन राज्य सरकारने 2 मे 2012 रोजी एका शासन निर्णयाद्वारे शिक्षक भरतीस बंद घातली. मात्र, या तारखेनंतरही नियमबाह्य मान्यतांच्या आधारे शिक्षण संस्थांनी शिक्षकांना सेवेत घेतले. राज्यात खासगी अनुदानित, शासकीय आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांतील सुमारे 35 हजार 977 शिक्षकांच्या मान्यता या भरतीबंदीच्या आदेशानंतर देण्यात आल्याचे आयुक्तालयाच्या कागदपत्रांवरून दिसून येते. 

"सकाळ'ने नियमबाह्य आणि बनावट मान्यतांचा विषय लावून धरल्याने आयुक्त धीरजकुमार यांनी टप्प्याटप्प्याने त्याची छाननी सुरू केली आहे. शिक्षणाधिकारी आणि उपसंचालक यांनी अवैधरित्या दिलेल्या मान्यतांच्या आधारे या शिक्षकांना शालार्थ वेतन प्रणालीत समाविष्ट करण्यात आले असून, त्यांचा पगारही सुरू झाला आहे. या नियमबाह्य वर्तनामुळे सरकारवर आर्थिक भार पडल्याने आयुक्त कार्यालयाने नुकतीच चार हजार 338 शिक्षक मान्यतांची तपासणी केली आहे. त्यात दोन हजार 818 मान्यता या अधिकाऱ्यांनी नियम डावलून दिल्याचे स्पष्ट झाले आहे. 

भरतीबंदी काळात शिक्षकांना नियुक्ती देणे, नियुक्‍तीसाठी द्यावयाच्या जाहिरातीस मान्यता न घेणे, असे उल्लंघन केले असतानाही अधिकाऱ्यांनी मान्यता दिल्या आहेत. विधिमंडळातही हा मुद्दा आला होता. शिक्षण आयुक्त धीरजकुमार याबाबत म्हणाले, ""वैयक्तिक मान्यतांच्या तपासणीत त्या नियमबाह्य पद्धतीने दिल्याचे दिसून येत असले, तरी ज्या शिक्षकांच्या या मान्यता आहेत, त्यांना या प्रकरणी म्हणणे मांडण्याची संधी दिली जाईल. त्यानंतर नियमबाह्य मान्यतांप्रकरणी निर्णय घेण्यात येईल.'' 

पुणे जिल्ह्यातील स्थिती 
स्तर मान्यता तपासल्या नियमबाह्य मान्यता 
माध्यमिक 72 54 
उच्च माध्यमिक 62 60 

"शालार्थ'मध्ये अवैध "घुसखोरी' 
खासगी शाळा शिक्षक संख्या 
प्राथमिक 4888 
माध्यमिक 14,904 
उच्च माध्यमिक 3065 
अध्यापक विद्यालय 137 
सराव पाठशाळा 9 
सैनिकी शाळा 34 
एकूण 23,037 

Web Title: Well listen to teachers recognized side