देणगी दानपेटीतील जुन्या नोटांचे काय?

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 28 डिसेंबर 2016

पुणे - देणगीरूपाने आणि दानपेटीत जमा झालेल्या पाचशे आणि हजार रुपयांच्या नोटांचे करायचे काय, असा प्रश्‍न देवस्थान आणि धर्मादाय संस्थांना पडला आहे. निर्बंधामुळे या नोटा बॅंकेत भरता येत नाहीत, तसेच त्या बॅंकेत दाखल करण्याची मुदत जवळ आल्याने याबाबतचे निर्देश लवकर जारी करावेत, अशी मागणी या संस्थांनी धर्मादाय आयुक्त आणि राज्य सरकारकडे केली आहे.

पाचशे आणि हजार रुपयांच्या नोटा चलनातून रद्द केल्यानंतर केंद्र सरकारच्या निर्देशानुसार राज्य सरकारने राज्यातील सर्व देवस्थाने, धर्मादाय संस्थांना या नोटा दान, देणगी स्वरूपात घेऊ नये, नागरिकांना त्या नोटा देण्यापासून परावृत्त करावे, दानपेटीजवळ या आशयाचा फलक लावावा, या नोटा बॅंकेत दररोज जमा करू नये, असे आदेश दिले होते. पुढील आदेश मिळेपर्यंत या नोटांचा स्वतंत्र हिशेब ठेवावा, असेही आदेशात नमूद केले होते. त्यानुसार देवस्थान, धर्मादाय संस्था कार्यवाही करीत आहेत. पण आता दानपेटीत काही भाविकांनी या नोटा टाकल्याने देवस्थानांसमोर प्रश्‍न निर्माण झाला आहे. या नोटा बॅंकेत भरता येत नाहीत, तसेच जुन्या नोटा बॅंकेत भरण्याची मुदत 30 डिसेंबर असून, ती जवळ आली आहे. या संदर्भात राज्य सरकारकडून पुढील निर्देश आले नसल्याने ही रक्कम बॅंकेत भरली गेली नाही तर भविष्यात त्याचा काहीच उपयोग होणार नाही.

या संदर्भात श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टचे कोशाध्यक्ष महेश सूर्यवंशी, श्रीमती लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्तमंदिर ट्रस्टचे विधी सल्लागार ऍड. शिवराज कदम यांनी धर्मादाय आयुक्त आणि राज्य सरकारकडे निवेदन पाठविले आहे. सूर्यवंशी म्हणाले, ""ट्रस्टकडे सध्या सुमारे 7 लाख 36 हजार रुपयांच्या जुन्या नोटा जमा झाल्या आहेत. केंद्र सरकारने घेतलेल्या निर्णयाविषयी आमचे काही म्हणणे नाही; परंतु या नोटा भरण्याची परवानगी आम्ही मागितली आहे.'' 30 डिसेंबरपूर्वीच राज्य सरकारने या संदर्भात पुढील निर्देश देणे आवश्‍यक आहे, अन्यथा या नोटा बाद होतील, अशी भीती ऍड. कदम यांनी व्यक्त केली आहे.

Web Title: What about old notes in temple?