घरातील प्लॅस्टिकचे करायचे काय ?

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 24 जून 2018

राज्य सरकारने प्लॅस्टिक बंदी लागू केली आहे. त्यानुसार महापालिकेच्या घन कचरा व्यवस्थापन विभागाने अंमलबजावणीच्या दृष्टीने तयारी केली होती. 140 निरीक्षक आणि 30 वरिष्ठ निरीक्षक आणि पथकांची नियुक्ती केली आहे.

पुणे : महापालिकेने प्लॅस्टिक बंदीच्या अंमलबजावणीस सुरवात केली आहे. पहिल्याच दिवशी 73 जणांवर कारवाई करून सुमारे 3 लाख 69 हजार 100 रुपये दंड वसूल केला. 8 हजार 711 किलो प्लॅस्टिक आणि 75 किलो थर्माकोल जमा केला आहे. त्यामुळे आता घरातील प्लॅस्टिकचे करायचे काय असा प्रश्‍न सर्वसामान्य नागरिकांना पडला आहे. तर महापालिकेचे अधिकारी चुकीच्या पद्धतीने कारवाई करीत असल्याचा आरोप व्यापारी करू लागले आहेत. 

राज्य सरकारने प्लॅस्टिक बंदी लागू केली आहे. त्यानुसार महापालिकेच्या घन कचरा व्यवस्थापन विभागाने अंमलबजावणीच्या दृष्टीने तयारी केली होती. 140 निरीक्षक आणि 30 वरिष्ठ निरीक्षक आणि पथकांची नियुक्ती केली आहे. शनिवारी महापालिकेच्या सर्व क्षेत्रीय कार्यालयांतर्गत कारवाईस सुरवात झाली. प्लॅस्टिक वापर करणाऱ्यांना काही ठिकाणी समज देण्यात आली. काही ठिकाणी कारवाई करून प्लॅस्टिक आणि थर्माकोल जप्त केले गेले. यापुढेही वापर सुरू राहिला तर अधिक कडक कारवाई केली जाईल, असा इशाराही प्रशासनाकडून दिला गेला. 

प्लॅस्टिक बंदीची अंमलबजावणी सुरू झाल्याने व्यापारी नाराजी व्यक्त करीत आहे. तर सर्व सामान्यांना घरातील प्लॅस्टिकच्या पिशव्या, कचऱ्याचे करायचे काय असा प्रश्‍न पडला आहे. महापालिकेने महिन्याभरापूर्वी नागरिकांना आवाहन करून क्षेत्रीय कार्यालयात प्लॅस्टिक आणि थर्माकोलचा कचरा जमा करण्यास सांगितले होते. त्यास नागरिकांकडून अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाही. 

त्यावेळी साधारण 42 टन इतका प्लॅस्टिक आणि थर्माकोलचा कचरा जमा झाला होता. नागरिकांनी त्यांच्याजवळी प्लॅस्टिकचा कचरा हा संबंधित क्षेत्रीय कार्यालयात जमा करावा, असे आवाहन घन कचरा व्यवस्थापन विभागाचे सहआयुक्त सुरेश जगताप यांनी केले आहे. 
 
क्षेत्रीय कार्यालयांची नावे आणि पत्ता पुढीलप्रमाणे -

- नगर रोड, वडगाव शेरी क्षेत्रिय कार्यालय : झुंजार हौसिंग सोसायटी, वडगाव शेरी, नगर रस्ता 
- येरवडा, कळस, धानोरी क्षेत्रिय कार्यालय : येरवडा गाडीतळ, नगर रस्ता 
- ढोले पाटील रस्ता क्षेत्रिय कार्यालय : राजश्री शाहु महाराज रस्ता, 
- औंध - बाणेर क्षेत्रीय कार्यालय : महाराजा सयाजीराव गायकवाड उद्योग भवन, औंध 
- घोले रोड - शिवाजीनगर क्षेत्रिय कार्यालय : घोले रोड, महापौर बंगल्यासमोर 
- कोथरुड - बावधन क्षेत्रिय कार्यालय : गोल्डन हिंद इमारत, पंराजपे शाळेशेजारी , डि. पी. रस्ता, कोथरुड 
- धनकवडी - सहकारनगर क्षेत्रिय कार्यालय : माधवराव कदम भवन, राजीव गांधी प्राणी संग्रहालय , कात्रज 
- सिंहगड रस्ता क्षेत्रिय कार्यालय : राजमाता जिजाऊ इमारत, नवीन डीपी रस्ता, वडगांव बुद्रुक 
- वारजे - कर्वेनगर क्षेत्रिय कार्यालय : स्वप्नशिल्प इमारतीशेजारी, कर्वेनगर 
- हडपसर - मुंढवा क्षेत्रीय कार्यालय : हडपसर भाजी मंडईजवळ ( पंडीत जवाहरलाल भाजी मंडई ) 
- वानवडी - रामटेकडी क्षेत्रिय कार्यालय : के.पी.सी.टी मॉल, ईनामदार रुग्णालयाजवळ, शिवरकर रस्ता, फातिमानगर

- कोंढवा - येवलेवाडी क्षेत्रिय कार्यालय : कोंढवा - कात्रज रस्ता 
- कसबा - विश्रामबागवाडा क्षेत्रिय कार्यालय : शनिपार जवळ, महापालिका व्यावसायिक इमारत, सदाशिव पेठ 
- भवानी पेठ क्षेत्रिय कार्यालय : जनरल अरुणकुमार वैद्य स्टेडीअम, भवानी पेठ 
- बिबवेवाडी क्षेत्रिय कार्यालय : उत्सव बिल्डींग, सातारा रस्ता, सिटी प्राईट चित्रपटगृहाशेजारी.

Web Title: What do you do with indoor plastic