रेशन दुकानांतून काय झाले गायब बघा

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 19 जानेवारी 2020

रेशन दुकानांमधून सध्या डाळी गायब असल्याचे चित्र आहे. याआधी रेशन दुकानांमध्ये निकृष्ट दर्जाची तूर आणि हरभराडाळ असल्यामुळे शिधापत्रिकाधारकांनी ती खरेदी करणे टाळले होते. त्यामुळे पुरवठा विभागानेही नवीन डाळी खरेदी न केल्याने सध्या रेशन दुकानांमध्ये डाळींची टंचाई निर्माण झाली आहे.

पुणे - रेशन दुकानांमधून सध्या डाळी गायब असल्याचे चित्र आहे. याआधी रेशन दुकानांमध्ये निकृष्ट दर्जाची तूर आणि हरभराडाळ असल्यामुळे शिधापत्रिकाधारकांनी ती खरेदी करणे टाळले होते. त्यामुळे पुरवठा विभागानेही नवीन डाळी खरेदी न केल्याने सध्या रेशन दुकानांमध्ये डाळींची टंचाई निर्माण झाली आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

रेशन दुकानांमधील हरभराडाळीचा दर ४५ रुपये किलो आहे, तर बाजारात हीच डाळ ५० ते ५३ रुपये किलो आहे. तसेच, रेशन दुकानांतील हरभराडाळीला कीड लागल्याचे निदर्शनास आले होते. त्यामुळे निकृष्ट दर्जाची डाळ असल्याच्या तक्रारी नागरिकांनी केल्या होत्या. त्यामुळे पुरवठा विभागाने ती डाळ परत केली. परंतु, त्यानंतर डाळ बदलून मिळण्यास दीड-दोन महिन्यांचा कालावधी जातो. त्यामुळे पुन्हा रेशन दुकानदारही डाळ घेण्यास धजावत नाहीत. दुसरीकडे उडीदडाळीस जास्त मागणी नसल्याचे सांगितले जाते. परंतु, तिला सध्या जास्त मागणी असल्याचे रेशन दुकानदारांचे म्हणणे आहे. 

रेशन दुकानामध्ये सध्या तूरडाळीचा दर ५५ रुपये किलो आहे. खुल्या बाजारात हा दर ७० ते ७५ रुपये किलो आहे. त्यामुळे गरीब आणि मध्यमवर्गीय शिधापत्रिकाधारकांना रेशन दुकानातून तूरडाळ खरेदी करणे परवडते. रेशनवरील तूरडाळीला मागणी आहे. परंतु, काही भागांतील रेशन दुकानांमध्ये तूरडाळ मिळते, तर काही ठिकाणी मिळत नसल्याची तक्रार आहे. त्यामुळे रेशन दुकानांमधून डाळी उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणी शिधापत्रिकाधारकांकडून होत आहे.

पुरवठादारांकडून प्राप्त हरभराडाळीचा दर्जा खराब होता. ती बदलून घ्यावी लागली. डाळ बदलून देण्यास दोन महिने लागतात. उडीदडाळीला जास्त मागणी नाही. परंतु, तूरडाळ पुरेशा प्रमाणात उपलब्ध आहे.
- अस्मिता मोरे, अन्नधान्य वितरण अधिकारी

गोदामातील जुना डाळींचा साठा रेशन दुकानदारांच्या माथी मारला जात आहे. पुरवठा विभागाने चांगल्या दर्जाची तूर, उडीद आणि हरभराडाळ उपलब्ध करून द्यावी. 
- गणेश डांगी, पुणे शहराध्यक्ष, अखिल महाराष्ट्र स्वस्त धान्य दुकान महासंघ

तूर आणि हरभराडाळीचा दर्जा खराब आहे. अर्धे किडलेले धान्य आणि डाळी घ्याव्या लागतात. आम्ही काय जनावरे आहोत का? सरकारने आम्हाला चांगले धान्य आणि डाळी द्याव्यात.
- बंडू जायभाय, शिधापत्रिकाधारक, बिबवेवाडी


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: What happened to the ration shop disappeared