Video : पर्युषण महापर्व म्हणजे काय? 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 26 ऑगस्ट 2019

जैन परंपरेत पर्युषण पर्वाला विशेष स्थान आहे. पर्युषण हा शब्द "परि' आणि "वस्‌' या दोन मूळ शब्दांपासून बनला आहे. पूर्ण रूपाने राहणे अथवा स्थिर होणे हा त्याचा अर्थ होय. अर्थातच आपल्यामध्ये चेतना नावाची अदृश्‍य शक्ती आहे त्यामध्ये स्थिर होणे. 

जैन परंपरेत पर्युषण पर्वाला विशेष स्थान आहे. पर्युषण हा शब्द "परि' आणि "वस्‌' या दोन मूळ शब्दांपासून बनला आहे. पूर्ण रूपाने राहणे अथवा स्थिर होणे हा त्याचा अर्थ होय. अर्थातच आपल्यामध्ये चेतना नावाची अदृश्‍य शक्ती आहे त्यामध्ये स्थिर होणे.

भौतिक सुविधांच्या आकर्षणाने चेतना दबली जाते. चेतनाशक्तीला जागृत करण्याचे प्रयत्न पर्युषण पर्वामध्ये होतात. जैन धर्माने विशिष्ट नियम दिला आहे. मनुष्य जसजसा आपल्या चेतनेच्या जवळ जाऊ लागतो, तसतसा तणाव कमी होत जातो. परिणामी त्याचे दुःख कमी होते, विकृतीसुद्धा कमी होते. चेतनेकडे जात असताना अथवा स्थिर होत असताना दोन प्रकारच्या अडचणी येतात. एक, चेतनेकडे जाण्याचा मार्ग माहीत नसतो आणि दुसरी जुन्या सवयी आपल्याला सोडत नसतात. चेतनेकडे जाण्याचा मार्ग संसारापासून वेगळा आहे. तो आपल्या विचार आणि धारणांच्या पलीकडील आहे. तोच मार्ग भगवान महावीरांनी अवलंबला होता. हा मार्ग म्हणजेच ध्यान आणि समता. या मार्गाने जाण्यासाठी आपल्याला स्वार्थकेंद्रित सवयी बदलाव्या लागतील. आपण पाच चांगल्या सवयींनी चेतनेचा अनुभव करू शकतो. पहिली आहे संवेदनशीलता. आपण स्वतःच्या दुःखांना दुःख समजतो, दुसऱ्यांच्या नाही. दुसऱ्यांच्या दुःखामध्ये दुःखाचा अनुभव करणे म्हणजेच संवेदनशीलता. दुसरी आहे स्नेहशीलता. नात्यांमध्ये स्वार्थ सोडून सद्‌भाव ठेवणे ही स्नेहशीलता होय.

आपण सुविधांच्या इतक्‍या आहारी गेलोय, की थोडेसुद्धा दुःख सहन होत नाही. दुःख सहन करण्याइतपत स्वतःला खंबीर बनविणे ही तिसरी सवय म्हणजेच सहनशीलता. आपल्या प्रत्येक यशासोबत अभिमान जोडला जातो. आपण आपल्या श्रेष्ठ शक्तीच्या अस्तित्वाचा स्वीकार करत नाही, परिणामी जीवनात संघर्ष येतो. सर्वोच्च शक्तीचा स्वीकार करणे ही चौथी सवय म्हणजेच समर्पणशीलता. जीवनामध्ये कोणाशी वितुष्ट आल्यानंतर आपण त्या व्यक्तीपासून दूर जातो. कोणत्याही चेतनेपासून दूर जाणे म्हणजे स्वतःच्याच चेतनेपासून दूर जाणे होय. दुसऱ्यांप्रती स्वीकारशीलता ही पाचवी सवय. या पाच सवयी साधणे हे पर्युषण पर्वाचे परम उद्दिष्ट आहे. त्याच आपल्या चेतनाशक्तीला मजबूत आणि समृद्ध करतात. 

 

 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: What is Payurshan Mahapravha?

टॅग्स