तुटवड्यावर उपाय काय?

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 24 नोव्हेंबर 2016

बॅंक अधिकाऱ्यांसमोर पेच; पाचशेच्या नव्या नोटेची प्रतीक्षा

बॅंक अधिकाऱ्यांसमोर पेच; पाचशेच्या नव्या नोटेची प्रतीक्षा

पुणे - रिझर्व्ह बॅंकेकडून बॅंकांना दोन हजार रुपयांच्या नोटांचाच सर्वाधिक पुरवठा होत आहे. वारंवार मागणी करूनही रिझर्व्ह बॅंकेकडून पाचशेच्या नव्या नोटांचा पुरवठा पुण्यातल्या बहुतांश बॅंकांना अद्याप झालेला नाही. येणाऱ्या रोजच्या भरण्यातही (डिपॉझिट) दहा ते शंभर रुपयांच्या नोटांचे प्रमाण वीस टक्‍क्‍यांहूनही कमी आहे. परिणामी नागरिकांना द्यायला बॅंकांकडे सुट्या पैशांचे पुरेसे चलनच नाही. परिणामी, इच्छा असूनही बॅंकांना चलनपुरवठा करता येत नसून, पाचशेची नवी नोट पुण्यात केव्हा येईल? हा प्रश्‍न सर्वसामान्यांप्रमाणे बॅंकांनाही पडला आहे.

पुण्यातील बॅंकांमार्फत अधिकृतरीत्या पाचशेच्या नव्या नोटांचे वितरण केव्हापासून सुरू होईल? याचे उत्तर बॅंक अधिकाऱ्यांकडे नाही. मुंबई, दिल्ली येथे पाचशेची नवी नोट चलनात आली आहे. मात्र, तेथील लोकसंख्या लक्षात घेता रिझर्व्ह बॅंकेने त्या शहरांना प्राधान्य दिले असावे किंवा नोटांची छपाई पुरेशा प्रमाणात झाली नसावी, असे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. त्यातच बॅंकांकडून आवाहन करूनही नागरिक सुट्या पैशांचा भरणा अत्यल्प प्रमाणात करीत असल्याचे निरीक्षण बॅंकांचे अधिकारी नोंदवीत आहेत.

दरम्यान, बॅंकांच्या करन्सी ॲडमिनिस्ट्रेशन सेलद्वारे करन्सी चेस्टकडे दररोजच्या भरण्यात पाचशे, हजारच्या जुन्या नोटा लाखोंच्या संख्येत जमा होत आहेत. सर्वाधिक शाखा असलेल्या एका राष्ट्रीयीकृत बॅंकेने गेल्या पंधरा दिवसांमध्ये सुमारे १७५ कोटी आणि १३२ कोटी रुपयांचा भरणा रिझर्व्ह बॅंकेकडे केला. 

मात्र त्यांच्याकडील करन्सी चेस्टला मागणीच्या तुलनेत तीस ते चाळीस टक्केच रक्‍कम येत आहे. त्यामुळे जमा रकमेतून संतुलन साधण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागत असल्याचे अधिकारी सांगतात. 

एटीएम सेंटर्सचे रिकॅलिब्रेशन सुरू असल्याची उत्तरे बॅंकांकडून मिळत आहेत. मात्र किती एटीएमचे रिकॅलिब्रेशन पूर्ण झाले, याबाबतही बॅंक अधिकाऱ्यांकडे  ठोस उत्तर नाही. एटीएम केंद्रांवरही पाचशेच्या नोटा केव्हा उपलब्ध होऊ शकतील, याबाबतही नागरिक आणि बॅंक कर्मचाऱ्यांतही संभ्रम आहे. वापरात येऊ शकतील अशा दहा ते शंभर रुपयांच्या नोटा बॅंकांकडून गेल्या पंधरा दिवसांत वितरित करण्यात आल्या. 

रिझर्व्ह बॅंकेकडून येणाऱ्या दहा ते शंभर रुपयांच्या नव्या नोटांचे प्रमाणही मर्यादित आहे. नागरिकही त्यांच्याकडील नोटा चलनात आणत नाहीत. त्यामुळे सुट्या पैशांचा प्रश्‍न सोडविणार तरी कसा? असा प्रश्‍नच बॅंक अधिकारी विचारत आहेत.

नोटांच्या तुटवड्याचा परिणाम

  •  बॅंकांमधील नागरिकांच्या रांगांचे प्रमाण घटू लागले
  •  एटीएमवर अजूनही रांगा 
  •  बहुतांश एटीएमचे अद्याप रिकॅलिब्रेशन अपूर्ण
  •  बॅंकांकडूनही दोन हजाराच्या नोटांचा पुरवठा 
  •  पाचशेच्या नव्या नोटांकरिता बॅंकांकडून आरबीआयशी वारंवार पत्रव्यवहार
  •  दहा ते शंभर आणि पाचशेच्या नव्या नोटांच्या अधिक पुरवठ्याची बॅंकांची आरबीआयकडे मागणी  
  •  नागरिक आणि प्रार्थना स्थळांनी सुटे पैसे चलनात आणण्याचे बॅंकांचे आवाहन

नोटा बदलाची आज शेवटची तारीख 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ८ नोव्हेंबरला पाचशे व हजार रुपयांच्या नोटा चलनातून बाद झाल्याची घोषणा केली. २४ नोव्हेंबरपर्यंत नोटा बदलून घेता येतील आणि ३० डिसेंबरपर्यंत या नोटांचा भरणा बॅंक आणि टपाल कार्यालयांत करण्यात येईल, असेही त्यांनी सूचित केले होते. त्याप्रमाणे गुरुवारी (ता. २४) बॅंका व टपाल कार्यालयांत पाचशे व हजार रुपयांच्या नोटा बदलून घेण्याचा शेवटचा दिवस आहे.

Web Title: what is the solution on currency shortage