व्हॉट्‌सॲप संवादामधून जुळताहेत रेशीमगाठी

रवींद्र जगधने
मंगळवार, 15 मे 2018

पिंपरी - व्हॉट्‌सॲप वापराचा सकारात्मक, नकारात्मक ऊहापोह कायमच होत असतो. मात्र, मातंग समाजातील काहींनी लग्नासाठी स्थळाच्या शोधात असलेल्या पालकांचे व्हॉट्‌सॲप ग्रुप तयार केले असून, त्या माध्यमातून अनेकांच्या रेशीमगाठी जुळत आहेत. 

पिंपरी - व्हॉट्‌सॲप वापराचा सकारात्मक, नकारात्मक ऊहापोह कायमच होत असतो. मात्र, मातंग समाजातील काहींनी लग्नासाठी स्थळाच्या शोधात असलेल्या पालकांचे व्हॉट्‌सॲप ग्रुप तयार केले असून, त्या माध्यमातून अनेकांच्या रेशीमगाठी जुळत आहेत. 

पाल्यांचे लग्न जमवणे हा पालकांसाठी मोठा जिवाळ्याचा विषय असतो. आपल्याच समाजातील चांगले स्थळ शोधण्याचा प्रयत्न त्यांचा असतो. एखादे लग्न कार्य किंवा इतर कार्यक्रमात पाहुण्याच्या भेटी होतात. त्या वेळी वधू-वरांबाबत ओळख होते. यासाठी लांबच्या कार्यालाही पालकांना हजेरी लावावी लागते. शहरी भागात वधू-वर सूचक मंडळ, संस्थांमध्ये वधू-वरांची नोंदणी केल्यानंतर अपेक्षेप्रमाणे संबंधित संस्था स्थळे दाखवतात. मात्र, अशा संस्थांच्या फी मोठी असतात. तर अनेकदा या ठिकाणी फसवणूक झाल्याच्या घटना घडल्या आहेत. तसेच समाजातील उच्च शिक्षितांची संख्या वाढत असताना त्यांच्या अपेक्षेप्रमाणे जोडीदार शोधणेही जिकिरीचे झाले आहे. त्यामुळे अशा लग्न स्थळांच्या शोधात असलेल्या लोकांना एकत्र आणण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते प्रा. धनंजय भिसे व मनोज कांबळे यांनी माहिती तंत्रज्ञानाचा वापर करत व्हॉट्‌सॲपचा ग्रुप तयार केला. त्याला चांगला प्रतिसाद मिळत असून, सुमारे पाच हजार लोक अप्रत्यक्षरीत्या संपर्कात आले आहेत. 

या ग्रुपवर संबंधितांचा बायोडाटा व फोटो पाहण्यास मिळत असल्याने अपेक्षेप्रमाणे जोडीदार शोधणे सहज सोपे झाले आहे. व्हॉट्‌सॲपच्या कोणत्याही ग्रुपवर अनावश्‍यक मेसेजचा त्रास असतो. मात्र, असे अनावश्‍यक मेसेज टाकणाऱ्यांना ग्रुपमधून बाहेर केले जात असल्याने तो त्रास होत नाही, असे भगवान गैरागर यांनी सांगितले. 

बायोडाटाचा विशिष्ट नमुना
ग्रुप ॲडमिनने बायोडाटासाठी विशिष्ट नमुना तयार केला असून, त्यात शौचालय असल्याचा उल्लेख करावा लागतो. त्यामुळे वराच्या घरी शौचालय आहे का, याची माहितीही मिळत असल्याचे ग्रुप सदस्यांनी सांगितले. 

मातंग समाजात मोठ्या प्रमाणात गरिबी असून, त्यात विविध संस्थांमार्फत घेतल्या जाणाऱ्या वधू-वर मेळाव्यात पैसे मोजावे लागतात. त्यामुळे वेळ, पैशाची बचत व्हावी व मोफत चांगला जोडीदार शोधता यावा, यासाठी केलेला हा प्रयत्न आहे. 
- प्रा. धनंजय भिसे

ग्रुपच्या माध्यमातून अनेक शिक्षित-उच्चशिक्षितांची मोबाईलमध्ये माहिती पाहता येते. फसवणूक होण्याचा धोका नसल्याने पालकांना चांगले स्थळ शोधणे सोपे होत आहे. 
- मनोज कांबळे

Web Title: whatsapp communication marriage relation

टॅग्स