मतांसाठी "व्हॉट्‌सऍप'चे जाळे 

मतांसाठी "व्हॉट्‌सऍप'चे जाळे 

पुणे - "महापालिका निवडणूक 2017', "लक्ष्य 2017', "अप्पांना विजयी करा', "पुणे मनपा 2017' आणि "ताईंना विजयी करा', असे कित्येक व्हॉट्‌सऍप ग्रुप सध्या चर्चेचा विषय ठरत आहेत. महापालिका निवडणुकीच्या प्रचारासाठी तयार केलेल्या व्हॉट्‌सऍप ग्रुपमधून मतदारांपर्यंत पोचण्याचा हा नवा फंडा इच्छुकांकडून अजमावला जात आहे. निवडणुकीपूर्वीच प्रभागातील हजारो नागरिकांपर्यंत इच्छुक पोचले आहेत. या नव्या प्रचार मोहिमेत त्यांना कार्यकर्ते आणि नातेवाईकही मदत करत आहेत. प्रचारासाठी इच्छुकांनी अशा प्रकारचे किमान 400 ग्रुप तयार केले आहेत. 

महापालिका निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर प्रभागातील हजारो मतदारांपर्यंत पोचण्यासाठी फेसबुकसह "व्हॉट्‌सऍप'चा वापर वाढला आहे. उमेदवार यादी घोषित होण्यापूर्वीच हा प्रचार सुरू झाला आहे. काहींनी हजारो रुपये देऊन सोशल मीडिया हाताळणाऱ्या एजन्सीची मदत घेतली आहे, तर काहींनी स्वबळावर प्रचार सुरू केला आहे. प्रभागातील 60 हजार मतदारांपैकी किमान 20 हजार मतदारांपर्यंत पोचता यावे, यासाठी हे ग्रुप महत्त्वाचे ठरत आहेत. इच्छुकांबरोबर पक्षांकडूनही ग्रुप तयार करण्यात आले आहेत. या ग्रुपला काहीतरी हटके नाव देऊन त्यातून प्रचार केला जात आहे. या ग्रुपमध्ये क्षणोक्षणीचे अपडेट पाहायला मिळत आहेत. त्यामुळे हा प्रचार लक्षवेधी आणि प्रभावी ठरत आहे. 

एजन्सीमार्फत हाताळणी 
इच्छुकांनी सोशल मीडियाच्या प्रचारासाठी खास एजन्सी नेमल्या आहेत. प्रचार रॅली, भेटीगाठी, कार्यकर्त्यांकडून होणारा प्रचार आणि संदेशांची माहिती एजन्सीतील कर्मचारी तातडीने या व्हॉट्‌सऍप ग्रुपवर अपलोड करत आहेत. अगदी प्रचारातील सेल्फी आणि छायाचित्रेही अपडेट केली जात आहेत. गणेश जयंतीच्या दिवशी खास प्रचाराचे क्षण, संदेश आणि छायाचित्रेही या ग्रुपवर पाहायला मिळाली. 

प्रचारासाठी खास ग्रुप 
या प्रचारासाठी युवा प्रचारकांची खास मदत घेतली जात असून, त्यांनीही व्हॉट्‌सऍपवर खास ग्रुप तयार केले आहेत. त्याशिवाय नातेवाइकांनीही स्वतःच्या ओळखीतल्या आणि त्याच्या ओळखीच्या लोकांचे ग्रुप बनवले आहेत. 

ग्रुपची साखळी 
एका व्हॉट्‌सऍप ग्रुपमध्ये किमान 256 लोकांचा समावेश असतो. अशा 256 लोकांचे 25 मुख्य (कोर) ग्रुप तयार करण्यात आले आहेत. या ग्रुपमधल्या प्रत्येक ऍडमिनने त्यांच्या स्तरावर 25 ग्रुप तयार केले आहेत. अशा पद्धतीने व्हॉट्‌सऍप ग्रुपची संख्या साखळीप्रमाणे वाढत आहे. या ग्रुपच्या माध्यमातून 16 हजार मतदार इच्छुकांशी जोडले गेले आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com