आळंदीत अतिक्रमणांवर कारवाई कधी? 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 6 जून 2018

आळंदी : आषाढी वारी अवघ्या महिनाभरावर आली तरी शहरातील रस्त्यास अडथळा ठरणारे अनधिकृत स्टॉल आणि अतिक्रमणे अद्याप हटविलेली नाहीत. मागील आठवड्यात गुरुवारी (ता. 31) इंद्रायणीकाठी पार्किंगच्या जागेतील अतिक्रमण पालिकेने हटविले. मात्र, दुसऱ्याच दिवशी पुन्हा स्टॉल उभे राहिले. पालिका अतिक्रमण केलेल्यांना फक्त नोटिसा पाठविण्याचे काम करत आहे. मात्र, कारवाईचा निश्‍चित मुहूर्त कधी, असा सवाल आळंदीकर विचारत आहेत. 

पालिकेने इंद्रायणीकाठच्या खाद्यपदार्थांच्या हातगाड्या आणि अनधिकृत शेड हटविण्याचे काम केले. त्यानंतर पालिका रोज अतिक्रमण काढणार असे प्रशासनाकडून सांगितले गेले. मात्र, गेल्या पाच दिवसांत एकही अतिक्रमण पालिकेने हटविले नाही. याउलट गुरुवारी केलेल्या कारवाईनंतर पुन्हा त्याच जागेवर खाद्यपदार्थांचे स्टॉल आणि हातगाड्या उभ्या झाल्या. प्रशासनाने यावर अद्याप कारवाई केलेली नाही.

गेल्या वर्षभरात आळंदीत अतिक्रमणे वाढलेली आहेत. प्रशासन आणि बांधकाम विभागाचा अंकुश आळंदीतील अतिक्रमणधारकांवर राहिला नाही. माउली मंदिरासमोर महाद्वारात, हनुमान दरवाजात स्वतःच्या मालकीची दुकाने सोडून रस्त्यावर दुकाने थाटल्याचे चित्र आहे. शनिमंदिराकडे जाणाऱ्या रस्त्यावर दोन्ही बाजूने अतिक्रमण झाल्यामुळे माउली मंदिराकडे जेमतेम दोनच भाविक रस्त्याने जाऊ शकतील एवढाच अरुंद रस्ता ठेवला आहे. याशिवाय चाकण चौक, वडगाव चौकाबरोबरच मरकळ रस्त्यावर खाद्यपदार्थांच्या हातगाड्या मोठ्या प्रमाणात उभ्या आहेत.

देहूफाटा चौकात रस्ता रुंदीकरणात अनेकदा बेकायदा अनधिकृत शेड पाडण्यात आले. मात्र, आता पुन्हा त्याच जागांवर अतिक्रमण झाले आहे. पालिकेच्या बांधकाम विभागाकडून अतिक्रमण काढण्यासाठी नोटिसा देण्याचे काम सुरू आहे. निव्वळ नोटिसाच पाठवून जबाबदारीतून सुटल्याची भावना पालिकेच्या कर्मचाऱ्यांची आणि प्रशासनाची दिसून येते. 

गेल्या दोन दिवसांपासून कर्मचारी अतिक्रमण केलेल्यांना नोटिसा वाटण्याचे काम करत आहेत. दोन दिवसांत जर अतिक्रमणे स्वतःहून हटविली नाही, तर पालिका धडक कारवाई करेल. 
- संघपाल गायकवाड, बांधकाम विभाग प्रमुख 

Web Title: When action against encroachment in Alandi?