वाहतूक कोंडीवर  उत्तर कधी?

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 25 ऑगस्ट 2018

खेड तालुक्‍यात चाकण, राजगुरुनगर येथील वाहतूक कोंडी हा न सुटणारा प्रश्न आहे का, अशी चर्चा नागरिकांमध्ये आहे. एक किलोमीटर अंतरासाठी या ठिकाणी दोन-दोन तास लागतात. ही कोंडी सुटणार तर कधी, असा प्रश्न येथील नागरिक उपस्थित करत आहेत. 

पुणे-नाशिक महामार्गाचे रुंदीकरण झाले; पण चाकणचे औद्योगीकरण होत असताना वाहतुकीचे कोणतेही नियोजन केलेले नव्हते, हे सध्याच्या चित्रावरून दिसत आहे. वाढत्या औद्योगिकरणाबरोबर वाहतूकही मोठ्या प्रमाणात वाढली. तुलनेने रस्ते कमी पडू लागले. त्यात रस्त्यालगतची अतिक्रमणे, अवैध वाहतुकीच्या वाहनांच्या रांगा, पथारीवाले यांची भर पडली. रस्त्यावर वाहनांच्या रांगा लागू लागल्या. सहापदरीकरणाचे जाऊ द्या, पहिली चाकणची वाहतूक कोंडी सोडवा, अशी मागणी होऊ लागली. या वाहतूक कोंडीला आता सारेच वैतागले आहेत. 
 
वाहतूक कोंडीची ठिकाणे 
पुणे-नाशिक महामार्गावर चिंबळी फाटा, मोई फाटा, कुरुळी फाटा, एमआयडीसी फाटा, आळंदी फाटा, तळेगाव चौक, आंबेठाण चौक; तसेच चांडोली टोल नाका ते राजगुरुनगर बाजार समिती कार्यालयापर्यंत वाहनांच्या कायम रांगा लागलेल्या असतात. रस्ते कंपनी या रस्त्यावर टोल आकारते; पण रस्त्यावरील खड्ड्यांकडे दुर्लक्ष करते. वाहतूक कोंडीच्या ठिकाणांचे सर्वेक्षण विरुद्ध बाजूने ये-जा करणाऱ्या वाहनांवर पोलिसांनी कारवाई केली पाहिजे. रहदारीस अडथळा ठरणाऱ्या वाहनांवर कारवाई केली पाहिजे.

अवैध वाहतुकीचा अडथळा 
पुणे-नाशिक, चाकण-तळेगाव, चाकण-शिक्रापूर, चाकण-आंबेठाण या मार्गावर अवैध वाहतूक मोठ्या प्रमाणात चालते. नाशिक महामार्गावर अवैध वाहतूक करणारी दहा हजारांवर वाहने आहेत. ही वाहने महामार्गावर चौकात अस्ताव्यस्त लावलेली असतात. पोलिसांकडून या वाहनांवर कारवाई होत नसल्याने त्यांचे फावते. 

रस्त्याची दुरवस्थाही जबाबदार  
पुणे-नाशिक महामार्ग तसेच  राज्यमार्गावर अनेक ठिकाणी खड्डे पडले आहेत. त्या खड्ड्यांत पाणी साचल्याने अपघात होतात. खड्डे मोठे असल्याने वाहतुकीस अडथळा निर्माण होतो. त्यामुळे वाहतूक मंदावते. 

पर्यायी मार्गावर इतर वाहने 
महामार्गाला समांतर असे दोन पर्यायी मार्ग चाकण शहराला; तसेच नाणेकरवाडी, मेदनकरवाडी गावाला जाण्यासाठी काढले आहेत. येथील पर्यायी मार्गावर खड्डे पडले आहेत. त्यामुळे वाहतूक सुरळीत राहण्यास अडथळे येतात. पर्यायी मार्गाचा वापर फक्त चाकण, नाणेकरवाडी, मेदनकरवाडी गावाच्या नागरिकांसाठी आहे; पण इतर वाहनांकडूनही या  पर्यायी मार्गाचा अवलंब केला जात असल्याने पर्यायी मार्गावरही वाहतूक कोंडी होते. 

चाकणला स्वतंत्र वाहतूक शाखा - पाटील
वाहतूक कोंडी सुरळीत करण्यासाठी तज्ज्ञांच्या; तसेच नागरिकांच्या सूचना लक्षात घेऊन उपाययोजना करण्यात येणार आहेत. वाहतूक पोलिसांची संख्याही वाढविली जाणार आहे. चाकणला स्वतंत्र वाहतूक शाखा; तसेच अधिकारी देण्यात येणार आहे. त्यामुळे वाहतूक सुरळीत होण्यास मदत होईल, असे पिंपरी-चिंचवडच्या पोलिस उपायुक्त स्मार्तना पाटील यांनी सांगितले.

Web Title: when slove chakan rajgurunagr traffic isuue