इंद्रायणीनगर केव्हा होणार कचरामुक्त

Indrayaninagar
Indrayaninagar

भोसरी - इंद्रायणीनगर परिसरात काही मोकळे भूखंड तसेच काही ठिकाणी रस्त्याकडेला कचरा, राडारोडा टाकण्यात येत असल्याने दुर्गंधी पसरली आहे. माशा, डास व रोगजंतूंमुळे नागरिकांचे आरोग्य धोक्‍यात आले आहे. बंगले आणि इमारतींनी नटलेल्या परिसराचे विद्रुपीकरणही होत आहे. त्यामुळे उघड्यावर कचरा टाकणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याची मागणी नागरिकांमधून होत आहे.

काही भागांमध्ये कचरा, राडारोडा, झाडाच्या फांद्या, पालापोचाळा, त्याचप्रमाणे गाद्या, उशा उघड्यावर टाकल्या जातात. या कचऱ्यामुळे उंदीर, घुशींची संख्या वाढली असून त्यांना खाण्यासाठी सापही येत असल्याचे काही नागरिकांचे म्हणणे आहे. त्याचप्रमाणे उघड्यावर शिळे अन्न टाकले जात असल्याने ते खाण्यासाठी जमा होणाऱ्या भटक्‍या कुत्र्यांचीही संख्या वाढत आहे. परिसरातील हा कचरा महापालिकेद्वारे तातडीने उचलला जात नसल्याने शिळे अन्न सडून दुर्गंधी पसरते.

महापालिकेच्या कचरा गाडीद्वारे फक्त कचरा स्वीकारला जातो. मात्र गादी, उशा अशा टाकलेल्या वस्तूंचा कचरा स्वीकारला जात नाही. त्यामुळे नागरिक रात्रीच्या वेळेस असा कचरा उघड्यावर टाकतात. त्याचप्रमाणे परिसरात इमारत व घरांची कामे सुरू असतात. त्यातून निघालेला राडारोडाही मोकळे भूखंड अथवा रस्त्याकडेला टेंपो, ट्रकद्वारे टाकला जातो. काही नागरिकांकडूनही कचरा उघड्यावर टाकला जातो. त्यामुळे परिसराचे विद्रुपीकरण झाले आहे.

शांतिसदन सोसायटीला भुर्दंड
शांतिसदन सोसायटीला शेजारील जागेत कचरा टाकू नका, असा फलक दोन वेळा लावावा लागला. एकदा हा फलक अज्ञात इसमाने गायब केला. त्यानंतर पुन्हा असा फलक लावण्यात आला असताना काही दिवसांत तो सुद्धा कुणीतरी काढून टाकला. यामुळे येथे नागरिक कचरा टाकतातच. त्यावरून बाचाबाचीही होते. कचऱ्यामुळे घुशींची संख्या वाढून त्यांनी सोसायटीजवळील जमीन भुसभुशीत केली होती. त्यामुळे दुरुस्तीसाठी सोसायटीला चाळीस हजारांचा भुर्दंड सोसावा लागला.

मोकळ्या जागांवर तळीराम
काही ठिकाणच्या मोकळ्या जागांवर तळीरामांचा ताबा असल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. काही ठिकाणच्या मोकळ्या भूखंडांवर दारूच्या बाटल्यांचा खचही पडलेला दिसतो.

सुका व ओला कचरा एकत्रच
महापालिकेद्वारे एक वर्षापूर्वी ओला व सुका कचरा गोळा करण्यासाठी घंटागाडी बंद करून नवीन वाहने सुरू करण्यात आली. त्याचप्रमाणे या वाहनावरील ध्वनिक्षेपकाद्वारे माहितीही दिली जाते. मात्र तरीही काही नागरिकांद्वारे दोन्ही कचरा एकत्रच करून कचरा गाडीत टाकला जातो. विशेष म्हणजे कचरा गोळा करणाऱ्या वाहनचालकांद्वारेही याला विरोध केला जात नाही. त्यामुळे हा उपाय नावालाच उरला आहे.

नागरिक म्हणतात...
भाजी मंडईशेजारील आमच्या इमारतीजवळ नागरिक कचरा टाकतात. महापालिकेकडे तक्रार केल्यानंतरच येथील कचरा दोन-तीन महिन्यांनंतर उचलला जातो. जवळील सार्वजनिक स्वच्छतागृहाचीही नियमित स्वच्छता नसल्याने दुर्गंधी येते.
- पांडुरंग गव्हाणे, नागरिक

मोकळ्या जागेत ट्रॅक्‍टर ट्रॉलीद्वारे राडारोडा टाकला जातो. काही वेळेस कचरा जाळलाही जातो. त्यामुळे धूर आणि दुर्गंधीचा त्रास होतो. मोकळ्या जागेमध्ये रस्त्याने जाणारे नागरिक लघुशंका करतात. त्यामुळे इमारतीमधील नागरिकांना त्रास होतो.
- उमेश वाल्हे, नागरिक, साईदर्शन सोसायटी

नगरसेवक म्हणतात...
गेल्या तीन महिन्यांपासून इंद्रायणीनगर परिसरातील मोकळे भूखंड आणि जागा आठवड्यातून दोन वेळा कर्मचाऱ्यांद्वारे स्वच्छ करण्यात येत आहे. दोन दिवसांपूर्वीच पोलिस लाइनच्या पाठीमागील परिसर स्वच्छ करून घेतला आहे. इंद्रायणी प्रभाग मोठा आहे. त्यामुळे सर्व मोकळे भूखंड एकदाच स्वच्छ करणे शक्‍य नाही. मात्र लवकरच हे सर्व भूखंड स्वच्छ करण्यात येतील.
- विलास मडिगेरी, अध्यक्ष, स्थायी समिती, महापालिका

कचरा उचलणारी गाडी सर्वसाधारण सकाळी आठनंतर येते. मात्र त्यापूर्वीच कामाला जाणाऱ्या नागरिकांद्वारे रस्त्याने जाता-जाता कचरा रिकाम्या जागी अथवा रस्त्याकडेला फेकला जातो. तरीही महापालिकेद्वारे कचरा नियमित उचलला जातो. 
- नम्रता लोंढे, नगरसेविका

(यासंदर्भात नगरसेवक विक्रांत लांडे आणि नगरसेविका सीमा सावळे यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com