पुणे- नाशिक रस्त्याची वाहतूक कोंडी सुटणार कधी...

nashik highway
nashik highway

राजगुरुनगर (पुणे) : पुणे- नाशिक महामार्गावरील खेड घाटात सातत्याने होणाऱ्या वाहतूककोंडीतून कधी दिलासा मिळणार, याची वाहनचालक आणि प्रवासी वाट पाहत असून, बाह्यवळणाचे काम वेगाने काम व्हावे, अशी अपेक्षा व्यक्त करीत आहेत. 

पुणे- नाशिक महामार्गाच्या खेड- सिन्नर या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 60 या रस्त्याचे चौपदरीकरण बरेचसे पूर्ण झालेले आहे. मात्र, उर्वरित काम ठेकेदार असलेली "आयएलएफएस' कंपनी आणि सरकार यांच्यातील वादामुळे तीन वर्षांपासून रखडलेले आहे. त्यामुळे चौपदरीकरण होऊनही ठिकठिकाणी वाहतूक कोंडी होत आहे. कारण, पुणे जिल्ह्यातून जाणाऱ्या पाच बाह्यवळणांची कामे रखडली आहेत. 

या प्रश्‍नावर तोडगा म्हणून माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी प्रयत्न करून बाह्यवळणांची कामे मूळ कामातून वगळून त्यांची 450 कोटी रुपयांची स्वतंत्र निविदा काढावयास लावली होती. मात्र, पाचही बाह्यवळणांची सुमारे 450 कोटींची कामे एकत्रपणे निविदाप्रक्रिया राबवून सुरू होण्यास विलंब होईल. त्यामुळे नेहमी वाहतूक कोंडी होणाऱ्या खेड घाट व नारायणगाव बाह्यवळणांची कामे अल्प मुदतीत स्वतंत्र निविदा राबवून करण्याचा निर्णयही आढळराव पाटील यांच्या मध्यस्थीने झाला. त्यानुसार साडेनऊ किलोमीटर लांबीच्या नारायणगाव बाह्यवळण व खेड घाटाच्या कामासाठी 89 कोटींची निविदा काढण्यात आली. निविदा प्रक्रियेनंतर 72 कोटी 88 लाख रुपयांची निविदा मार्च महिन्यात मंजूर झाली. मात्र, निवडणुकीमुळे ठेकेदाराला कार्यादेश जुलै महिन्यात देण्यात आले. त्यानंतर ठेकेदार रोडवे सोल्यूशन कंपनीकडून संथ गतीने काम सुरू आहे. कामाची मुदत एप्रिल महिन्यापर्यंत आहे. मुदतीत काम पूर्ण झाले, तर येत्या उन्हाळ्यामध्ये हा घाट वापराकरिता खुला होईल, असे सध्या चित्र आहे. 

खेड घाट बाह्यवळण काम सुरू असून, एप्रिल महिन्यापूर्वीच काम पूर्ण करण्याचा प्रयत्न सुरू आहे. या मार्गादरम्यान काही ठिकाणी पूल असल्याने ती कामे वेळखाऊ आहेत. बाकी काम लवकर होईल. पानमळा ते मोहिते विधी महाविद्यालय दरम्यानचा रस्ता तर एक महिन्यातच पूर्ण केला जाणार आहे. नारायणगाव बाह्यवळण कामही लवकर पूर्ण होऊ शकते, पण त्याठिकाणी उड्डाणपुलाची मागणी असल्याने काम थांबले आहे. अन्य बाह्यवळणांच्या निविदा काढण्यासाठी प्रक्रिया सुरू आहे. 
- दिलीप शिंदे, 
सहायक अभियंता, भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com