गुंडपुंड नव्हे, आताच्या राजकारणात "व्हाइट कॉलर' गुन्हेगार ! 

गुंडपुंड नव्हे, आताच्या राजकारणात "व्हाइट कॉलर' गुन्हेगार ! 

पुणे - ""गुन्हेगारांचे "शुद्धीकरण' करून त्यांना आपल्या पक्षांत प्रवेश देण्याविषयी जेव्हा राजकीय नेते समर्थन करतात, तेव्हा ते ऐकून मोठं गमतीशीर वाटतं. सध्या तर मतदारांना एकापेक्षा एक "गुणवत्तेचे' गुन्हेगारी पार्श्वभूमीचे उमेदवार येनकेन प्रकारे देऊ करण्याचा चंगच कित्येक राजकीय पक्षांनी बांधला आहे,'' अशा शब्दांत राजकीय विश्‍लेषक प्रा. सुहास पळशीकर यांनी राजकारणातील गुन्हेगारांच्या प्रवेशावर ओरखडे ओढले. 

शिवाय, सध्याचा काळ हा धाक-दडपशाही माजवणाऱ्या पारंपरिक गुंडापुंडांचा राहिला नसून, आता "व्हाइट कॉलर' राजकीय गुन्हेगारी ही राजकारणात आपला जम बसवू लागली आहे. जे अधिक गंभीर आहे, असे निरीक्षणही त्यांनी नोंदवले. 

दक्षिण आशियावरील अभ्यासक डॉ. मिलान वैष्णव लिखित "व्हेन क्राइम पेज : मनी अँड मसल इन इंडियन पॉलिटिक्‍स' या पुस्तकाच्या प्रकाशनाप्रसंगी गुरुवारी पळशीकर बोलत होते. पुणे इंटरनॅशनल सेंटरने हा कार्यक्रम आयोजिला होता. 

पळशीकर म्हणाले, ""ऐंशीच्या दशकापेक्षा आत्ताची राजकीय परिस्थिती खूप बदलली आहे. त्याकाळी राजकीय पक्षांकडून आपल्या स्थैर्यासाठी गुंडांची केवळ मदत घेतली जात असे. आता मात्र स्वतः गुंड हेच राजकीय पक्षाचे प्रतिनिधी म्हणून निवडूनही येऊ लागले आहेत.'' 

अर्थात, दुसरीकडे पार्टी वर्कर ते पेड वर्कर, असे स्थित्यंतर देखील याच काळात आपल्याला पाहायला मिळत आहे, असेही निरीक्षण पळशीकर यांनी नोंदवले. 

वैष्णव म्हणाले, ""देशात सर्वत्र गुन्हेगार आणि राजकारण यांचे लागेबांधे पाहायला मिळतात. आजच्या घडीला एक तृतीयांश खासदारांवर एखादातरी खटला सुरू आहे आणि एक पंचमांश खासदारांवर गंभीर गुन्हे दाखल आहेत.'' 

म्हणून आहे गुन्हेगारांची चलती ! 

वैष्णव यांनी नोंदवलेली निरीक्षणे : 
- निवडणुका आता अधिकाधिक महागड्या होत चालल्या आहेत, त्यामुळे पैशाने गडगंज असणारे गुन्हेगार राजकारण्यांना हवेच असतात. 

- ते त्यांच्या समाजातील भीतीमुळे हमखास जिंकतात, म्हणून पक्ष त्यांना पक्षात घेतो 

- जिथे सामाजिक भेदाभेद असतात, त्या भागांत भेदभावाची वागणूक मिळालेले लोक गुन्हेगारांना पाठिंबा देतात 

- लोकांना असते त्यांच्या "रॉबिनहुडी' वृत्तीचे आकर्षण 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com