पिंपरी शहराचे पहिले पोलिस आयुक्‍त कोण? 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 12 एप्रिल 2018

पिंपरी - महाराष्ट्र दिनाचा मुहूर्त साधून पिंपरी-चिंचवडचे पोलिस आयुक्‍तालय सुरू होणार आहे. यासाठी अवघे वीस दिवस शिल्लक आहेत. मात्र, अद्याप पोलिस आयुक्‍तालयाची जागाच निश्‍चित झालेली नाही. यामुळे आयुक्‍तालयाच्या जागेबरोबर शहराचे पहिले पोलिस आयुक्‍त कोण असणार, याबाबत नागरिकांमध्ये कमालीची उत्सुकता आहे. 

पिंपरी - महाराष्ट्र दिनाचा मुहूर्त साधून पिंपरी-चिंचवडचे पोलिस आयुक्‍तालय सुरू होणार आहे. यासाठी अवघे वीस दिवस शिल्लक आहेत. मात्र, अद्याप पोलिस आयुक्‍तालयाची जागाच निश्‍चित झालेली नाही. यामुळे आयुक्‍तालयाच्या जागेबरोबर शहराचे पहिले पोलिस आयुक्‍त कोण असणार, याबाबत नागरिकांमध्ये कमालीची उत्सुकता आहे. 

गुन्हेगारीचा वाढता आलेख लक्षात घेता पिंपरी-चिंचवड शहरासाठी स्वतंत्र पोलिस आयुक्‍तालयाची मागणी होत होती. यासाठी लोकप्रतिनिधींनी वारंवार पाठपुरावाही केला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी (ता. 10) पिंपरी-चिंचवड स्वतंत्र पोलिस आयुक्‍तालयाची घोषणा केली. एक मेपासून नवीन पोलिस आयुक्‍तालयाचे कामकाज सुरू होणार असल्याचे घोषित केले. यामुळे स्वतंत्र पोलिस आयुक्‍तालयाचे पहिले आयुक्‍त कोण असणार, याबाबत नागरिकांत उत्सुकता आहे. मंत्रालयस्तरावर यासाठी जोरदार फिल्डिंग लागली असल्याचे चर्चा पोलिस वर्तुळात सुरू आहे. 

पोलिस आयुक्‍तालयासाठी प्रेमलोक पार्क येथील महापालिकेची शाळा, प्राधिकरणाचे नवीन इमारतीमधील कोणतेही चार मजले आणि प्राधिकरणाची जुनी इमारत (सध्याचे फ प्रभाग कार्यालय) या जागांचा अहवाल वरिष्ठ पातळीवर पाठविण्यात आला आहे. डांगे चौक ते भूमकर चौक यादरम्यान असलेल्या सरकारच्या पशुवैद्यकीय विभागाची शंभर एकर जागा आहे. यापैकी पोलिस मुख्यालयासाठी 50 एकर जागेचा विचार सुरू आहे. पुणे-नाशिक महामार्गालगत मोशी स्पाइन रोडच्या कॉर्नरलाही प्राधिकरणाची 240 एकर जागा आहे. त्यापैकी 40 एकर प्रस्तावित आहे. मोशीची जागा मध्यवर्ती असल्यानेदेखील पोलिस मुख्यालयासाठी योग्य असल्याचा अहवाल देण्यात आला आहे. वाकडमधील जागा हिंजवडी, देहूरोडसाठी जवळ असून स्पाईन रोड येथील जागा चाकण, आळंदी येथील नागरिकांसाठी सोयीची आहे. 

पोलिस आयुक्‍तपदासाठी राजकीय फिल्डिंग? 
नवीन पोलिस आयुक्‍तपद हे अतिरिक्‍त महासंचालक दर्जाचे असणार आहे, तर अतिरिक्त आयुक्‍तपद हे उपमहानिरीक्षक दर्जाचे असणार आहे. या पदांवर वर्णी लागावी, यासाठी अनेकजण इच्छुक आहेत. यासाठी दररोज वेगवेगळी नावे चर्चेत येत आहेत. आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुका लक्षात घेता, आपल्याच मर्जीतील अधिकारी आणण्यासाठी राजकीय पातळीवरही प्रयत्न सुरू आहेत.

Web Title: Who is the first police commissioner of Pimpri city