Pune Election: गिरीश बापट यांचा वारस कोण? पोटनिवडणुकीसाठी भाजपकडून 5 तर काँग्रेसमधून दोघांची नावं चर्चेत | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Girish Bapat

Pune Election: गिरीश बापट यांचा वारस कोण? पोटनिवडणुकीसाठी भाजपकडून 5 तर काँग्रेसमधून दोघांची नावं चर्चेत

भाजपचे खासदार गिरीश बापट यांचं तीन दिवसांपूर्वी पुण्यामधील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात निधन झालं. वयाच्या 72 व्या वर्षी गिरीश बापट यांनी अखेरचा श्वास घेतला. गिरीश बापट गेल्या काही महिन्यांपासून आजारी होते. गिरीश बापट पुण्याचे खासदार होते. त्यांच्या अकाली निधनामुळे पुणे लोकसभा मतदारसंघाची जागा आता रिक्त झाली आहे. त्यामुळे येत्या सहा महिन्यात या रिक्त जागेवर पोटनिवडणूक होणार आहे.

मात्र, त्यापूर्वीच आता गिरीश बापट यांचा वारस कोण? अशी चर्चा पुण्यात रंगली आहे. पुणे लोकसभा पोटनिवडणुकीसाठी सर्वाधिक लॉबिंग भाजपमध्येच सुरू असल्याचं दिसून येत आहे. या जागेसाठी भाजपमधून एकूण पाच जण स्पर्धेत आहेत. त्यामध्ये माजी खासदारांचाही समावेश आहे. तर बापट यांच्या सूनेच्या नावाचीही चर्चा आहे. तर काँग्रेसमधून दोन जणांच्या नावाची चर्चा सुरू आहे. त्यामुळे भाजपमधून कुणाला आणि काँग्रेसमधून कुणाला उमेदवारी दिली जातेय, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

ही पोटनिवडणूक लागण्याआधीच उमेदवारांच्या नावांची चर्चा सुरू झाली आहे, काँग्रेसकडून माजी आमदार मोहन जोशी आणि अरविंद शिंदे यांच्या नावाची चर्चा सुरू आहे. भाजपमधून एकूण पाच जणांच्या नावांची सध्या चर्चा आहे. माजी खासदार संजय काकडे, मुरलीधर मोहोळ, सिद्धार्थ शिरोळे आणि जगदीश मुळीक यांची नावे भाजपमधून चर्चेत आहेत. मात्र बापट यांची सून स्वरदा बापट यांना उमेदवारी देऊन भाजप निवडणूक बिनविरोध करण्याची शक्यता अधिक आहे.

खासदार गिरीश बापट यांच्या निधनानंतर पुणे लोकसभा मतदारसंघात पोटनिवडणूक लागणार आहे. वर्षभरापेक्षा जास्त कालावधी शिल्लक असल्यामुळे निवडणूक लागण्याची दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे. तर दुसरीकडे काँग्रेसनेही निवडणूक लढवणार असल्याचं जाहीर केलं आहे.

मात्र, भाजपचा ही निवडणूक बिनविरोध करण्यावर भर असणार आहे. खासदार गिरीश बापट यांच्या निधनानंतर पुणे लोकसभा मतदारसंघात पोटनिवडणुकीची चर्चा सुरू झाली आहे, वर्षभरापेक्षा जास्त कालावधी शिल्लक असल्यामुळे पोटनिवडणूक लागेल, असं मत घटनातज्ज्ञ उल्हास बापट यांनी व्यक्त केलं आहे.