पुण्याचे नवे जिल्हाधिकारी कोण?; 'या' नावांची आहे चर्चा

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 4 August 2020

पुण्याचे जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांची पंतप्रधान कार्यालयात उपसचिव पदी नियुक्ती झाल्याने पुण्याचे नवे जिल्हाधिकारी कोण? याची चर्चा आता रंगली आहे.

पुणे : पुण्याचे जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांची पंतप्रधान कार्यालयात उपसचिव पदी नियुक्ती झाल्याने पुण्याचे नवे जिल्हाधिकारी कोण? याची चर्चा आता रंगली आहे. पुणे जिल्हाधिकारी या  महत्त्वाच्या पदावर कुणाची वर्णी लागणार याबाबत उत्सुकता असून, लातूरचे जिल्हाधिकारी जी श्रीकांत, मुंबई 'म्हाडा'चे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. योगेश म्हसे, 'पीएमआरडी'चे आयुक्त सुहास दिवसे आदींची नावे चर्चेत आहेत.

पुण्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

G.Sreekanth, IAS - Home | Facebook

जिल्हाधिकारी राम यांची मंगळवारी दुपारी पंतप्रधान कार्यालयात नियुक्ती झाल्याचे आदेश आले. पुण्यात कोरोनाचे संकट गंभीर असताना आणि ही परिस्थिती राम चांगल्या पद्धतीने हाताळत असतानाही त्यांची थेट केंद्रात झालेली नियुक्ती अनपेक्षित होती. राम यांच्यासाठी ही नियुक्ती त्यांच्या कामाची पावती समजली जात आहे, मात्र त्यांच्या बदलीमुळे रिक्त झालेल्या पदावर कोण येणार याबाबत मोठ्या प्रमाणावर चर्चा सुरू झाली आहे. यासंदर्भात आज रात्री किंवा उद्या राज्य सरकारकडून आदेश येण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

आणखी वाचा - शरद पवार पुन्हा ठरले चाणक्य

भिवंडीची हागणदारीमुक्तीकडे वाटचाल ...

पुण्याचे जिल्हाधिकारीपद भूषविणे 'आयएएस' अधिकाऱ्यांसाठी नेहमीच प्रतिष्ठेचे राहिले आहे. त्यामुळे या पदावर येण्यासाठी नेहमीच अधिकाऱ्यांमध्ये चढाओढ असते. चांगला अधिकारी निवडण्याबाबत उपमुख्यमंत्री व पुण्याचे पालकमंत्री अजित पवार हे नेहमी आग्रही असल्याने ते कोणाला पसंती देणार हेही महत्त्वाचे ठरणार आहे.

MSWC :: Board of Directors

दरम्यान, दुपारपासून जी नावे चर्चेत आहेत त्यामध्ये लातूरचे जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांचे नाव आघाडीवर आहे. श्रीकांत हे तरुण, तडफदार आणि कार्यक्षम अधिकारी आहेत. लातूर जिल्हाधिकारी म्हणून त्यांनी अत्यंत चांगले काम केले आहे. त्यामुळे त्यांचे नाव आघाडीवर असल्याचे समजते.

याशिवाय पुण्यात विविध पदांवर काम केलेले आणि पुणे जिल्ह्याची संपूर्ण माहिती असणारे डॉ. योगेश म्हसे यांचेही नाव चर्चेत आहे. डॉ. म्हसे यांची नुकतीच मुंबई म्हाडाच्या सीईओपदी नियुक्ती झाली आहे. भिवंडी महापालिकेचे आयुक्त म्हणूनही त्यांनी काम पाहिले आहे. कार्यक्षम अधिकारी म्हणून म्हसे हे ओळखले जातात तसेच पालकमंत्री अजित पवार यांच्या विश्वासातील अधिकारी अशी ओळख असल्याने त्यांचेही नाव आघाडीवर आहे. 

'पीएमआरडीए' चे आयुक्त म्हणून नुकतेच रुजू झालेले सुहास दिवसे यांचेही नाव या पदासाठी चर्चेत आहे. दिवसे यांनीही पुण्यात निवासी उपजिल्हाधिकारी अतिरिक्त आयुक्त, कृषी आयुक्त अशा विविध पदांवर काम केले असून, त्यांनाही पुणे जिल्ह्याची चांगली ओळख आहे. त्यामुळे त्यांच्याही नावाचा विचार या पदासाठी होऊ शकतो. 

पिंपरी-चिंचवड महापालिकेचे आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी पिंपरी-चिंचवड मध्ये कोरोनाची परिस्थिती चांगल्या प्रकारे हाताळली आहे.  पुणे जिल्ह्यातील सध्याची गंभीर परिस्थिती पाहता त्यांच्याही नावावर चर्चा होऊ शकते. पालकमंत्री अजित पवार हेच याबाबत मुख्यमंत्र्यांशी बोलून अंतिम निर्णय घेतील. हे महत्वाचे पण असल्याने लवकरात लवकर नवे जिल्हाधिकारी कोण हे निश्चित होईल,  असे एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Who is the new Collector of Pune