राज्याचे सरकार बदलल्यावर या साखर कारखान्यातही होते सत्तांतर

sugarcane
sugarcane

माळेगाव (पुणे) : माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या कारभारावर गेल्या साडेचार वर्षात अनेकदा आलेली राजकीय संकटे भाजप सरकारमुळे टळली गेली. त्यामुळे भाजपचे नेते व कारखान्याचे अध्यक्ष रंजन तावरे व ज्येष्ठ नेते चंद्रराव तावरे यांनी आजवर नेटाने कारभार यशस्वी करून दाखविला. परंतु, आता राज्यात बदलती सत्तेची समीकरणे विचारात घेता भाजपच्या गोटात चिंता; तर राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या तंबूत गेल्या दोन दिवसांपासून कमालीचा उत्साह संचारल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. 

माळेगाव कारखान्याची पंचवार्षिक निवडणूक एप्रिल 2020 मध्ये आहे. राज्यात भाजप- शिवसेनेकडे सत्ता आली की कारखान्यातही सत्तांतर होते, हा आजवरचा इतिहास आहे. सन 1997 व 2015 मध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या पॅनेलचा पराभव करत विरोधी गटाचे पॅनेल कारखान्याच्या निवडणुकीत यशस्वी झाले आहे. त्यामुळे एप्रिलमध्ये कारखान्याच्या निवडणुकीला सामोरे जाताना प्रत्येक गटाला आपल्या विचाराचे सरकार राज्यात असणे जमेचे वाटते. 

"पवारसाहेबांचे मोठे योगदान' 
याबाबत कारखान्याचे माजी अध्यक्ष व राष्ट्रवादीचे नेते बाळासाहेब तावरे म्हणाले, ""माळेगाव कारखाना हा मुळातच पवारसाहेबांचा कारखाना म्हणून ओळखला जातो. या कारखान्याच्या स्थापनेपासून पवारसाहेबांच्या नेतृत्वाखाली शेतकरी सभासदांचा प्रपंच समृद्धीस आलेला आहेत. कारखाना कार्यक्षेत्रातील शेतकऱ्यांच्या मुलांचा उच्च शिक्षणाचाही प्रश्न सोडविण्यासाठी पवारसाहेबांनी सुरवातीला दिलेले योगदान खूप मोठे आहे. अजितदादा आणि पवारसाहेबांचे नेतृत्व किती मोठे आहे, हे विधानसभेच्या निवडणुकीत राज्यातील जनतेने दाखवून दिले आहे. त्यामुळे माळेगावच्या निवडणुकीत सभासद राष्ट्रवादी पॅनेलच्या पाठीशी उभे राहतील.'' 

"कारखान्याचे सभासद सुज्ञ' 
रंजन तावरे म्हणाले, ""माळेगाव कारखान्याचे सभासद सुज्ञ आहे. राज्यात सरकार कोणाचेही जरी असले, तरी माळेगाव सभासद आपला प्रपंच डोळ्यासमोर ठेवून निवडणुकीत निर्णायक भूमिका घेत असतो. त्यामुळे चिंता करण्याचे कारण नाही. या कारखान्याचा कारभार भाजप पक्षाच्या विचाराने चालू आहे. शेतकऱ्यांना इतरांच्या तुलनेत अधिकचे दोन पैसे दिले आहेत. त्यामुळे आगामी कारखान्याच्या निवडणुकीत सभासद मोठ्या संख्येने आमच्या बरोबर असतील.''  

 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com