पाण्याच्या टाकीचे उद्‌घाटन कोण करणार? 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 7 जानेवारी 2017

पुणे - निवडणुकीच्या तोंडावर इच्छुकांमध्ये विकासकामांच्या उद्‌घाटनांची स्पर्धा रंगू लागली असून, कर्वेनगरमधील पाण्याच्या टाकीच्या उद्‌घाटनावरून भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नगरसेवकांमध्ये जुंपली आहे. प्रभागात टाकी असल्याचे सांगत, राष्ट्रवादीच्या नगरसेवकाने तिचे उद्‌घाटन केले, तर माझ्या पुढाकारातून पाण्याची टाकी उभारल्याचा दावा करीत, मुख्यमंत्र्यांच्या हस्ते टाकीचे उद्‌घाटन करण्याची तयारी नगरसेवक राजेश बराटे यांनी चालविली आहे. 

पुणे - निवडणुकीच्या तोंडावर इच्छुकांमध्ये विकासकामांच्या उद्‌घाटनांची स्पर्धा रंगू लागली असून, कर्वेनगरमधील पाण्याच्या टाकीच्या उद्‌घाटनावरून भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नगरसेवकांमध्ये जुंपली आहे. प्रभागात टाकी असल्याचे सांगत, राष्ट्रवादीच्या नगरसेवकाने तिचे उद्‌घाटन केले, तर माझ्या पुढाकारातून पाण्याची टाकी उभारल्याचा दावा करीत, मुख्यमंत्र्यांच्या हस्ते टाकीचे उद्‌घाटन करण्याची तयारी नगरसेवक राजेश बराटे यांनी चालविली आहे. 

कर्वेनगर परिसरातील रहिवाशांना पुरेसे पाणी पुरविण्यासाठी काकडे सिटी परिसरात सुमारे साडेचार कोटी रुपये खर्च करून सव्वालाख लिटर क्षमतेची पाण्याची टाकी उभारण्यात आली आहे. त्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या तिकिटावर निवडून आलेले मात्र, आता भाजपमध्ये प्रवेश केलेल्या बराटे यांनी पाठपुरावा केला, त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते टाकीचे उद्‌घाटन करण्यात यावे, असा प्रस्ताव महापालिकेतील गटनेत्यांच्या बैठकीत भाजपने मांडला. त्याकरिता, खासदार संजय काकडे यांनी मुख्यमंत्र्यांची वेळही घेतली; परंतु ही टाकी आपल्या पक्षाच्या नगरसेवकाचा प्रभाग असल्याचे सांगत, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते अजित पवार यांच्या हस्ते टाकीचे उद्‌घाटन करण्याचा ठराव मंजूर करण्यात आला. त्यानुसार राष्ट्रवादीचे नगरसेवक सचिन दोडके यांच्या पुढाकारातून उद्‌घाटन झाले. राष्ट्रवादीने मनमानी करीत बेकायदा उद्‌घाटन केल्याचा आरोप बराटे यांनी केला असून, आता पुन्हा मुख्यमंत्र्यांच्याच हस्ते टाकीचे उद्‌घाटन करण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. त्यावरून भाजप आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये वादाला तोंड फुटण्याची शक्‍यता आहे. त्यातच, टाकी उभारण्यासाठी बराटे यांनी सतत पाठपुरावा केल्याचे या भागातील राष्ट्रवादीच्या एका ज्येष्ठ नगरसेवकांनी सांगितल्याने वादात भर पडण्याची शक्‍यता आहे. 

बराटे म्हणाले, ""या भागातील रहिवाशांना कायमस्वरूपी पुरेसे पाणी देण्यासाठी 2011 पासून टाकीसाठी पाठपुरावा केला आहे. टाकीचे काम होऊ नये, यासाठी राष्ट्रवादीच्या नगरसेवकाने अडथळा आणला होता; परंतु कोणतीही कल्पना न देता केवळ श्रेय घेण्यासाठी उद्‌घाटन करण्यात आले.'' 

दोडके म्हणाले, ""विकामकामात राजकारण करीत नाही. टाकीचे काम झाल्याने त्याचे उद्‌घाटन करण्यात आले आहे. त्यासाठी माझाही पुढाकार होता.'' 

मुख्यमंत्र्यांच्याच हस्ते उद्‌घाटन 
महापालिका निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते केवळ उद्‌घाटने करीत आहेत. प्रकल्प उभारण्यात काडीचाही संबंध नसतानाही राष्ट्रवादी कॉंग्रेस देखावा करीत आहे. या टाकीचे उद्‌घाटन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणे अपेक्षित होते; परंतु त्याला विरोध करीत, राष्ट्रवादीने राजकारण केले आहे; परंतु नागरिकांवर त्याचा कोणताही परिणाम होणार नाही. मुख्यमंत्र्यांच्याच हस्ते उद्‌घाटन करू, असे खासदार संजय काकडे यांनी सांगितले.

Web Title: Who will inaugurate the water tank