...म्हणून बाबा भिडे पूल पुणेकरांसाठी महत्त्वाचा

मंगेश कोळपकर
मंगळवार, 30 जुलै 2019

पावसाळ्यातील पाणी ओसरल्यावरही हा पूल वाहतूकीला खुला करता येतो, हे त्याचे वैशिष्ट्य. नारायण, शनिवार, सदाशिव पेठेतून डेक्कन जिमखाना परिसरात जाण्यासाठीचा हा शॉर्टकट पुणेकरांच्या अंगवळणी पडला आहे, तो अजूनही कायम आहे. 

पुणे : ना. सी. फडके, सुहास शिरवळकर यांच्या कादंबऱ्यांत अनेकदा उल्लेख झालेल्या बाबा भिडे पुलाची हकीकत मोठी मनोरंजक आहे. मुठा नदीवर डेक्कन परिसरात पूर्वी चार कॉजवे होते. संभाजी पुलाच्या दोन्ही बाजूला प्रत्येकी दोन कॉजवे होते. गरवारे कॉलेज आणि पांचाळेश्‍वर तर, दुसरीकडे सध्याच्या बाबा भिडे पुलाच्या जागेवर आणि पुलाची वाडी येथे. पादचारी, सायकलस्वार त्याचा वापर करीत आणि संध्याकाळी चक्कर मारण्यासाठीही हे पुणेकरांचे आवडीचे पूल होते. 

1992-93 च्या सुमारास संभाजी पुलाच्या दोन्ही बाजूला दुचाकी वाहनांसाठी पूल बांधण्यात आले. एक पुना हॉस्पिटलच्या बाजूला तर, दुसरा डेक्कन जिमखाना बस थांब्याच्या बाजूला. हे दोन्ही पूल बांधून झाल्यावर संभाजी पूल दुचाकी वाहनांसाठी बंद करण्यात आला. वर्दळ वाढू लागली म्हणून उर्वरित तिन्ही कॉजवे महापालिकेने पाडून टाकले. 

डेक्कन जिमखाना परिसरात सुमारे फर्ग्युसन, बीएमसीसी, मराठवाडा मित्र मंडळ आदी महाविद्यालये आणि शैक्षणिक संस्था आहेत. तेथे जाणारे विद्यार्थी नारायण पेठेतून डेक्कन जिमखान्यावर पोचण्यासाठी जुन्या कॉजवेचा (लहान पूल) वापर करीत. त्यांची संख्या वाढू लागल्यावर डेक्कन जिमखाना बस स्टँडच्या मागे कॉजवे पाडून 1996 च्या सुमारास हा पूल बांधण्यात आला. नारायण पेठेतील भाजपचे तत्कालीन नगरसेवक विकास मठकरी यांनी त्यासाठी पाठपुरावा केला आणि हा पूल तयार झाल्यावर त्याला जनसंघातील ज्येष्ठ नेते, ज्येष्ठ विधीज्ञ बाबा भिडे यांचे नाव देण्याचा ठराव त्यांनी महापालिकेत मांडला.

भिडे हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रचारकही होते. पावसाळ्यातील पाणी ओसरल्यावरही हा पूल वाहतूकीला खुला करता येतो, हे त्याचे वैशिष्ट्य. नारायण, शनिवार, सदाशिव पेठेतून डेक्कन जिमखाना परिसरात जाण्यासाठीचा हा शॉर्टकट पुणेकरांच्या अंगवळणी पडला आहे, तो अजूनही कायम आहे. 
bhide pul

भिडे पूल पाण्याखाली; नदीपात्रातील रस्त्याने येऊ नका!"


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Why Baba Bhide is Important for Pune