ब्राह्मण्यवाद्यांनी स्फोट केले, मुस्लिम लटकले; पुस्तकाचे प्रकाशन

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 14 ऑगस्ट 2019

समाजात भेदभाव नाही, अशी वरवरची मलमपट्टी केली जाते, पण बॉंबस्फोट झाला की पोलिसांना विशिष्ट समाजावरच का संशय येतो, असा सवाल मुंबई उच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश अभय ठिपसे यांनी आज येथे उपस्थित केला. 

पुणे : समाजात भेदभाव नाही, अशी वरवरची मलमपट्टी केली जाते, पण बॉंबस्फोट झाला की पोलिसांना विशिष्ट समाजावरच का संशय येतो, असा सवाल मुंबई उच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश अभय ठिपसे यांनी आज येथे उपस्थित केला. 

सेवानिवृत्त पोलिस अधिकारी एस. एम. मुश्रीफ लिखित "ब्राह्मणीस्ट बॉम्ब्ड मुस्लींम हॅंग्ड' (ब्राह्मण्यवाद्यांनी स्फोट केले, मुस्लिम लटकले) या इंग्रजी पुस्तकाचे प्रकाशन ठिपसे, माजी मुख्य सचिव रत्नाकर गायकवाड यांच्या हस्ते झाले. या वेळी निवृत्त पोलिस अधिकारी सुधाकर आंबेडकर, मुकुंद काकडे उपस्थित होते. 

ठिपसे म्हणाले, "मुश्रीफ यांनी जे मुद्दे मांडले आहेत, त्याचे लोक समर्थनही करत नाहीत आणि खंडनही. त्यापेक्षा यावर चर्चा झाली पाहिजे. अजमेर बॉंबस्फोटात ज्या हिंदूंना शिक्षा झाली, ते आपल्या देशाचे शत्रू आहेत. बॉंबस्फोट करणाऱ्या संघटना हिंदूंच्या प्रतिनिधी नाहीत. मुश्रीफ यांनी तपास यंत्रणांवर केलेले आरोप खोटे निघाले तर मला आनंदच आहे, पण यंत्रणा चुकीच्या पद्धतीने काम करत असतील तर हे भयानक आहे. विशिष्ट समाज वाईट आहे, त्यापासून धोका आहे, असा आकस निर्माण केला जातो, हे नष्ट झाले पाहिजे.'' 

मुश्रीफ म्हणाले, "देशात कुठेही बॉंबस्फोट झाला की आयबीच्या अधिकाऱ्यांच्या आदेशानुसार मुस्लिमांना पकडले जात होते. जर्मन बेकरी स्फोटात जे सीमकार्ड मिळाले, त्याचा तपास झाला असता तर सारंग कुलकर्णीचे नाव पुढे आले असते. पण मुस्लिम आरोपी पाहिजे असल्याने हिमायत बेगला अडकवले. अशा अनेक प्रकरणांमध्ये मुस्लिम तरुणांना गोवण्यात आले.'' 

गायकवाड म्हणाले, "राज्यघटनेने निरपराध व्यक्तींवर अन्याय होऊ नये, असे सांगितले आहे. ज्यांचा स्वातंत्र्य, समता, बंधुता या तत्त्वांवर विश्‍वास नाही त्यांनी आपली देशभक्ती तपासून घ्यावी. ब्राह्मण्यवाद आणि ब्राह्मण हे वेगळे आहेत, हे पुस्तक वाचल्यावर कळते.'' आंबेडकर यांनी या वेळी मनोगत व्यक्त केले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Why blame bomb blasts on a particular society Abhay Thipse asks