जागेअभावी रखडले रस्ता रुंदीकरण

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 7 नोव्हेंबर 2016

पिंपरी -  पदपथावरील अतिक्रमण, बेशिस्त पार्किंग ही प्रमुख कारणे वाहतूक कोंडीस जबाबदार आहेतच. परंतु थरमॅक्‍स चौकाकडून आकुर्डी चौकात येताना चौकाजवळची जागा महापालिकेच्या ताब्यात नसल्याने रस्त्याचे काम रखडले आहे. यामुळे खंडोबामाळ चौकात वाहतुकीची कोंडी होत आहे.
आकुर्डी चौकाच्या पदपथांवर व्यापारी व फेरीवाल्यांनी अतिक्रमण केले आहे. यामुळे नागरिकांना जीव मुठीत धरून जावे लागते. दुसरीकडे पालिकेनेही अतिक्रमणांकडे दुर्लक्ष केले आहे. आकुर्डीहून निगडी, चिंचवड, थरमॅक्‍स चौक व पिंपरीकडे जाणाऱ्या मार्गावरच कॉर्नरला शेअर रिक्षा उभ्या असतात.

कधी-कधी तर मुख्य रस्त्यावरच ट्रिपल पार्किंग करून त्या उभ्या केल्या जातात. यामुळे एकच बस जाऊ शकेल इतकी जागा शिल्लक राहते. यामुळे सिग्नल सुटल्यावर चौकातच मोठ्या प्रमाणात वाहतुकीची कोंडी होते. आकुर्डी गावठाणाच्या दिशेने जाणाऱ्या मार्गावर कॉर्नरला स्टॅंडवर रिक्षा उभ्या केल्या जातात. निगडीकडे जाणारा बीआरटीचा मार्ग खुला केला असला, तरी त्यामध्ये वाहने पार्क केली जातात.

आकुर्डी चौकातील वाहतूक कोंडीची समस्या दूर व्हावी, यासाठी माजी आयुक्‍त डॉ. श्रीकर परदेशी यांनी थॅरमॅक्‍स चौकाकडून येणारा रस्ता रुंद करावा, अशी सूचना केली. त्यानुसार कंपनीने सीमाभिंत मागे घेऊन रस्त्यासाठी जागा दिली. परंतु परदेशी यांची बदली झाल्यानंतर जागा ताब्यात घेण्यास पालिकेला यश आलेले नाही.

भंगार वाहने रस्त्यावरच
निगडीकडे जाणाऱ्या मार्गावरही अनेक दुचाकीस्वार नो-एंट्रीतून वाहने आकुर्डी चौकात आणतात. तसेच पिंपरीकडे जाणाऱ्या रस्त्यावर गॅरेजवाल्याने भंगारातील वाहने पदपथ व रस्त्यावरच उभी केली आहे. फेरीवाल्यांनीही पदपथ व्यापले आहेत.

भिकाऱ्यांच्या टोळीचा त्रास
आकुर्डी चौकात भिकाऱ्यांची टोळी कार्यरत आहे. सिग्नलला वाहने थांबल्यानंतर महिला व लहान मुले भीक मागतात. उन्हात दुपारी बॅंकेसमोरच्या रस्ता दुभाजकातील झाडाच्या आडोशाला बसतात. महिला व लहान मुलांमुळे अपघात होण्याची शक्‍यता आहे. अनेकदा लहान मुले पैशाच्या मागणीसाठी मोटारीच्या बोनेटवर जाऊन बसतात.

चौकातच डासोत्पत्ती स्थानक
आकुर्डी चौकात निगडी व पिंपरीच्या दिशेने कारंज्यांचे सुशोभीकरण केले होते. आता हे कारंजे कित्येक दिवसांपासून बंद आहेत. मात्र, येथील जागेत पाणी साचले असून, त्यातून डासोत्पत्ती मोठ्या प्रमाणात होते. हे सुशोभीकरण महापालिकेनेच केल्याने आता डासोत्पत्ती होणाऱ्या या ठिकाणाबद्दल पालिका कोणाला दंड करणार, असा प्रश्‍न नागरिक विचारत आहेत.

खंडोबा माळ चौकातील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी रस्ता रुंदीकरणाचा प्रस्ताव पुढे आला होता. संबंधित कंपनीकडून जागा खाली करून घेतली. मात्र, त्या जागेवर काही नागरिकांनी हक्‍क सांगितला. जागा पालिकेच्या ताब्यात आली नाही. त्यामुळे त्या रस्त्याचे डांबरीकरण करता येत नाही.
- सतीश इंगळे, कार्यकारी अभियंता

Web Title: The widening of the road held up due to lack of space