चारित्र्याच्या संशयावरून पत्नीचा खून

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 15 डिसेंबर 2018

पुणे - चारित्र्यावर संशय घेऊन पतीने पत्नीचा गळा आवळून खून केल्याची धक्कादायक घटना शुक्रवारी सकाळी कात्रज येथे घडली. दरम्यान, पतीने विष घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. भारती विद्यापीठ पोलिसांनी अत्यवस्थेतील पतीला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले.

पुणे - चारित्र्यावर संशय घेऊन पतीने पत्नीचा गळा आवळून खून केल्याची धक्कादायक घटना शुक्रवारी सकाळी कात्रज येथे घडली. दरम्यान, पतीने विष घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. भारती विद्यापीठ पोलिसांनी अत्यवस्थेतील पतीला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले.

आरती विनोद चव्हाण (वय 35, रा. शिवशंभूनगर, कात्रज-कोंढवा रस्ता, कात्रज) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. तर, विनोद तानाजी चव्हाण (वय 35) असे तिच्या पतीचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विनोद हा खासगी वाहनावर चालक म्हणून काम करतो.

तो पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन तिच्याशी सातत्याने भांडणे करीत होता. मागील वर्षभरापासून दोघांमध्ये भांडणे सुरू होती. दरम्यान, शुक्रवारी सकाळी त्यांची दोन मुले शाळेत गेल्यानंतर त्यांच्यात भांडण झाले. त्यानंतर साडेदहा वाजता विनोदने आरतीला जबर मारहाण करून गळा आवळल्याने तिचा जागीच मृत्यू झाला. या घटनेनंतर विनोदने स्वतः विष घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला.

घराचा दरवाजा बराच वेळ बंद असल्यामुळे शेजाऱ्यांनी त्यांचे दार वाजविले. परंतु प्रतिसाद न मिळाल्याने त्यांनी खिडकीची काच फोडून
आतमध्ये पाहिले असता आरती मृतावस्थेत आढळून आली.

तिच्याजवळ विनोदही अत्यवस्थेत पडलेला शेजाऱ्यांनी पाहिले. याबाबत त्यांनी भारती विद्यापीठ पोलिसांना महिती दिली. पोलिस घटनास्थळी दाखल झाल्यानंतर त्यांनी विनोदला तत्काळ खासगी रुग्णालयात उपचारासाठी नेले. मात्र, प्रकृती गंभीर असल्यामुळे त्याला ससून रुग्णालयात हलविण्यात आले.

चारित्र्याच्या संशयावरून पतीने पत्नीचा गळा आवळून खून केला. त्यानंतर त्याने स्वत: विष पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्याच्या तब्येतीत सुधारणा होत आहे.
- विष्णू पवार, पोलिस निरीक्षक, भारती विद्यापीठ.

Web Title: Wife Murder by Husband Crime