पुणे : पती-पत्नीतील वाद कोणत्या थराला जाईल आणि ते कशा प्रकारे एकमेकांना त्रास देतात, याचे अनेक धक्कादायक प्रकार सध्या समाजात घडत आहेत. जोडप्यातील वादातून अशीच एक घटना कोंडव्यात घडली. तब्येत ठीक नसल्याने शारीरिक संबंधास पत्नीने नकार दिला, म्हणून पतीने चक्क तिच्या अंगावरच लघुशंका केली.
याबाबत पत्नीने पती विरोधात न्यायालयात कौटुंबिक हिंसाचाराची तक्रार दिली असून पोटगीची देखील मागणी केली होती. अब्दुल आणि हीना (नावे बदललेले) असे या जोडप्याचे नाव आहे. ते गेल्या पाच वर्षांपासून कोंडव्यात राहत आहेत. अब्दुल एका खासगी कंपनीत नोकरी करतो, तर हीना गृहिणी आहे. त्यांच्यात गेल्या काही दिवसांपासून कौटुंबिक वाद सुरू आहेत.
याबाबत हीना यांनी दाखल केलेल्या याचिकेत नमूद आहे की, माहेरहून आल्यानंतर अब्दुलने हीना यांच्याकडे शारीरिक सुखाची मागणी केली. मात्र, तब्येत ठीक नसल्याने हीना यांनी त्यास नकार दिला. त्यामुळे अब्दुलने हीना यांच्या अंगावरच लघूशंका केली. याबाबत त्यांनी सासूला सांगितले असता त्या म्हणाल्या की, "लघुशंका केली तर काय झाले तो तुझा पतीच आहे ना,'' तर दिराने त्यांना पाय दाबण्यास सांगून विनयभंग केला.
हीना यांनी याबाबत पोलिस आयुक्त कार्यालयातही तक्रार दाखल केली होती. त्यावर दोघांचे समुपदेशन करण्यात आले. त्यानंतर अब्दुल हीना यांना नांदविण्यास तयार झाला. मात्र, त्याच दिवशी त्यांना घरी घेऊन जात असताना त्याने हीना यांना दुचाकीवरून ढकलून दिले होते. त्या अपघातात हीना यांच्या पायाला जखम झाली होती.
हीना यांना दरमहा 10 हजार रुपये पोटगी देण्याचे आदेश न्यायालयाने अब्दुलला दिले होता. मात्र त्याने गेल्या 15 महिन्यांत पोटगी स्वरूपातील एक लाख 43 हजार रुपये दिलेच नाही. त्यामुळे हीना यांनी ऍड. वसीम पठाण यांच्यामार्फत न्यायालयात तक्रार दाखल केली होती. न्यायालयाने दोन्ही बाजूंचे म्हणणे लक्षात घेऊन अब्दुलची 225 दिवस तुरुंगात रवानगी केली आहे.
अब्दुल यांचे यापूर्वी देखील लग्न झाल्याचे मला समजले होते. लग्नानंतर एका आठवड्यातच त्यांनी माझे दागिने गहाळ केले. शारीरिक संबंध ठेवण्यास नकार दिला म्हणून त्यांनी माझ्या अंगावरच लघूशंका केली. हा सर्व प्रकार विसरून पुन्हा नांदण्यासाठी गेले, तेव्हा नणंदेने शिवीगाळ केली. त्यांनी मुलींची फसवणूक करण्याचा उद्योगच सुरू केला आहे.
- हीना (पीडित महिला)
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.