वन्यप्राण्यांसाठी पर्यावरणपूरक पाणवठे

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 16 एप्रिल 2019

वन्यप्राण्यांना उन्हाळ्याच्या काळात पाणीसाठा उपलब्ध होण्यासाठी पाणवठ्याच्या रचनेत बदल करण्यात आला आहे. नान्नज अभयारण्यात याचा पहिला यशस्वी प्रयोग करण्यात आला असून, पुणे, शिरूर, जुन्नर, बारामती, दौंड, इंदापूर अशा राखीव वनक्षेत्रात असे पाणवठे बांधले जाणार आहेत.
- आर. के. वानखेडे, वन्यजीव वनसंरक्षक

पुणे - ऐन दुष्काळाच्या काळात वन्यप्राण्यांची तहान भागविण्यासाठी पर्यावरणपूरक पाणवठे करण्याला वन विभागाने प्राधान्य दिले आहे. अत्यंत कमी जागेत आणि कोणतेही मोठे बांधकाम साहित्य न वापरता हे पाणवठे तयार करण्यात येत आहेत. सोलापूरमध्ये हा प्रयोग केला असून, पुणे जिल्ह्यातही हा उपक्रम राबविण्यात येणार आहे.

वन्यप्राण्यांना पाणी उपलब्ध करून देण्यासाठी बांधण्यात येत असलेल्या या पाणवठ्यात टॅंकरने पाणी भरण्यात येते. यापूर्वी केलेल्या पाणवठ्यांमधील पाण्याचे उन्हाळ्यात मोठ्या प्रमाणात बाष्पीभवन होते, असा अनुभव होता. त्यावर पर्याय म्हणून हे अभिनव पाणवठे तयार करण्यात येत आहेत.

पाणवठ्याचा आकार बशीसारखा आहे. या पाणवठ्याच्या मध्यभागी मातीचे बेट तयार करण्यात आले आहे. त्यात विविध झाडे आणि रोपे लावली जातात. त्याच्या कडेच्या भागात तीन ते चार वेगवेगळे कप्पे केले आहेत. त्यात पाणी सोडण्यात येते. तसेच, त्याचा बहुतांश भाग झाडाच्या सावलीत येईल अशी रचना असते. त्यामुळे बाष्पीभवन होत नाही. 

या पाणवठ्याच्या बांधकामासाठी दगड आणि मातीचा वापर केला जातो. त्यामुळे वन्यप्राण्यांसाठी हा उपयुक्त ठरतो. या प्रकारच्या बांधकामाचा खर्चही कमी असतो. मात्र, दीर्घकालीन साठ्यासाठी या पाणवठ्याला मर्यादा आहेत. मात्र, छोट्या वनक्षेत्रासाठी हे प्रभावी ठरतात.

Web Title: Wild Animal Eco Friendly Water