वन्यजीव चित्रपट महोत्सव आजपासून रंगणार

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 22 ऑगस्ट 2019

फर्ग्युसन महाविद्यालयाच्या अँफी थिएटरमध्ये गुरुवार (ता. २२) पासून वन्यजीव चित्रपट महोत्सव होणार आहे. त्याचे उद्‌घाटन प्रसिद्ध वन्यजीव चित्रपटकार शेकर दत्तात्री यांच्या हस्ते संध्याकाळी सहा वाजता होईल. या अंतर्गत शुक्रवारी (ता. २३) वन्यजीव चित्रपटकार नल्ला मुत्थू यांच्याशी अभिनेता सुयश टिळक संवाद साधणार आहेत. त्यातून मुत्थू यांचा जीवनपट उलगडेल.

पुणे - फर्ग्युसन महाविद्यालयाच्या अँफी थिएटरमध्ये गुरुवार (ता. २२) पासून वन्यजीव चित्रपट महोत्सव होणार आहे. त्याचे उद्‌घाटन प्रसिद्ध वन्यजीव चित्रपटकार शेकर दत्तात्री यांच्या हस्ते संध्याकाळी सहा वाजता होईल. या अंतर्गत शुक्रवारी (ता. २३) वन्यजीव चित्रपटकार नल्ला मुत्थू यांच्याशी अभिनेता सुयश टिळक संवाद साधणार आहेत. त्यातून मुत्थू यांचा जीवनपट उलगडेल.

नेचर वॉक चॅरिटेबल ट्रस्ट, फर्ग्युसन महाविद्यालय आणि महाराष्ट्र राज्य वनविभाग वन्यजीव (पश्‍चिम) यांच्यातर्फे या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. महोत्सवाचे हे दुसरे वर्ष असून सृष्टी फाउंडेशन आणि ॲड-व्हेंचर फाउंडेशन हे याचे सहआयोजक आहेत. आपण एखादा माहितीपट नॅशनल जिओग्राफीसारख्या वाहिन्यांवर बघतो, त्या वेळी आपल्या मनात त्या माहितीपटाविषयी अनेक प्रश्‍न निर्माण होतात. माहितीपट बनवण्याची प्रक्रिया, त्यामागचा विचार अशा अनेक प्रश्‍नांची उत्तरे मुत्थू यांच्या मुलाखतीतून पुणेकरांना मिळतील. ही मुलाखत शुक्रवारी सायंकाळी साडेसहा वाजता होणार आहे.

शेकर दत्तात्री हे भारतातील प्रसिद्ध वन्यजीव चित्रपटकार असून राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर त्यांना वन्यजीव माहितीपटांसाठी गौरविले आहे. शेकर हे वन्यजीव संरक्षण व संवर्धन या विषयांवर चित्रपट निर्मितीला भारतात सुरवात करणाऱ्या जुन्या चित्रपटकारांपैकी आहेत. त्यांच्या ‘रेस टू सेव्ह अमूर फाल्कन’ या वन्यजीव चित्रपटात ईशान्य भारतात स्थलांतर करून येणाऱ्या ‘अमूर फाल्कन’ या पक्ष्यावर भाष्य केले आहे. येथे या पक्ष्याची मोठ्या प्रमाणावर शिकार होत असे. पण, या चित्रपटामुळे या पक्ष्याच्या संरक्षणासाठी विशेष प्रयत्न केले गेले आणि होणाऱ्या शिकारीला आळा बसला. या चित्रपटासारख्या त्यांनी निर्मिती केलेल्या काही इतर चित्रपटांमुळेही निसर्ग संवर्धन आणि संरक्षणासाठी विशेष प्रयत्न करण्यास सुरवात झाली. ‘इंडियाज डीसअपिअरिंग बीचेस’, ‘चिल्का- ज्वेल ऑफ ओडिशा’, ‘द ट्रुथ अबाऊट टायगर्स’, ‘सेव्ह अवर शोलास’, ‘द रिडलेज लास्ट चान्स’, ‘मॉन्सून- इंडियाज गॉड ऑफ लाइफ’, ‘सायलेंट व्हॅली- ॲन इंडियन रेन फोरकास्ट’ अशा वन्यजीव माहितीपटांची निर्मिती त्यांनी केली आहे. त्यांच्याशी संवाद साधण्याची आणि त्यांच्या काही कामांची क्षणचित्रे दृकश्राव्य माध्यमातून पाहण्याची संधी या महोत्सवाच्या निमित्ताने निसर्गप्रेमींना मिळणार आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Wild Animal India Film Festival