हवा, पाणी ऑनलाइन कसे मिळवणार? 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 23 ऑगस्ट 2019

‘नेचर वॉक चॅरिटेबल ट्रस्ट’, फर्ग्युसन महाविद्यालय आणि वनविभाग यांच्यातर्फे आयोजित ‘वाइल्ड इंडिया फिल्म फेस्टिव्हल’चे उद्‌घाटन शेकर दत्तात्री यांच्या हस्ते झाले.

पुणे-  ‘‘प्रत्येक माणूस श्‍वास घेतो. प्रत्येकाला पिण्यासाठी शुद्ध पाणी हवंय. यासाठी प्रत्येक माणसाने आता पर्यावरणवादी होण्याची वेळ आली आहे,’’ असे वन्यजीव चित्रपटकार शेकर दत्तात्री यांनी गुरुवारी येथे सांगितले. ‘‘मोबाईल ऑनलाइन विकत मिळत असला तरी स्वच्छ हवा आणि पाणी ऑनलाइन कसे मिळवणार,’’ असा सवालही त्यांनी केला. 

‘नेचर वॉक चॅरिटेबल ट्रस्ट’, फर्ग्युसन महाविद्यालय आणि वनविभाग यांच्यातर्फे आयोजित ‘वाइल्ड इंडिया फिल्म फेस्टिव्हल’चे उद्‌घाटन शेकर दत्तात्री यांच्या हस्ते झाले. या वेळी सामाजिक कार्यकर्त्या लीला पूनावाला, वन विभागाचे अतिरिक्त प्रधान मुख्य वनसंरक्षक सुनील लिमये, ‘नेचर वॉक संस्था’चे विश्‍वस्त चंद्रसेन शिरोळे, फर्ग्युसन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. रवींद्रसिंह परदेशी, संजय देशपांडे, अमोल रावेतकर, रमेश कुमार, विवेक खरवडकर आणि अनुज खरे उपस्थित होते. 

शेकर म्हणाले, ‘‘एखाद्या विषाणूप्रमाणे मनुष्यप्राणी पृथ्वीवर सर्वत्र वेगाने पसरत आहे. त्याने नद्यांमधून पाणी वाहून जायला जागा ठेवली नाही, की जंगले सुरक्षित ठेवली नाहीत, त्यामुळे पुराचे पाणी शहरात घुसत आहे.’’ 

अवनी वाघिणीला गोळ्या घालून मारल्याप्रकरणी बोलताना ते म्हणाले, ‘‘सोशल मीडियावर सक्रिय असणारे, काचेच्या इमारतीत बसणारे अनेकजण अवनी वाघिणीच्या मृत्यूमुळे हळहळले. पण तिला मारण्याचा वनविभागाचा निर्णय योग्य होता. आपण रोजच्या जगण्याला एवढे वैतागलोय, इतका ताण आणि त्रास आहे, की विरंगुळा म्हणून आपण निसर्ग जगायला निघतो. जंगलात जाऊन प्राण्यांना त्रास देतो. व्याघ्र पर्यटन हा मूर्खपणा थांबला पाहिजे. निसर्ग खूप देतो; पण आपण घेणे कधी थांबवणार, निसर्गाला देण्याची संस्कृती कधी अंगीकारणार. अनिरुद्ध दडके यांनी सूत्रसंचालन केले. प्रशांत कोठडिया यांनी आभार  मानले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Wild India Film Festival was inaugurated by Shaker Dattatre