वन्यजीवांची वणवण टाळण्याचे प्रयत्न

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 17 मार्च 2017

पुणे - मार्च महिना म्हटला, की साधारणपणे जंगलातील पाणवठे आटल्याचे चित्र दिसते. परिणामी पाण्याच्या शोधात वन्यप्राण्यांची भटकंती (किंवा स्थलांतर) सुरू होते. वन्यजीवांची ही वणवण थांबविण्यासाठी वन अधिकाऱ्यांचे नियोजन सुरू झाले आहे. पाणवठ्यांची पाहणी करणे, जुन्या कृत्रिम पाणवठ्यांमधील गाळ काढणे, काही ठिकाणी नव्याने पाणवठे तयार करणे, अशी कामे सध्या वन विभागाच्या वतीने हाती घेतली जात आहेत.

पुणे - मार्च महिना म्हटला, की साधारणपणे जंगलातील पाणवठे आटल्याचे चित्र दिसते. परिणामी पाण्याच्या शोधात वन्यप्राण्यांची भटकंती (किंवा स्थलांतर) सुरू होते. वन्यजीवांची ही वणवण थांबविण्यासाठी वन अधिकाऱ्यांचे नियोजन सुरू झाले आहे. पाणवठ्यांची पाहणी करणे, जुन्या कृत्रिम पाणवठ्यांमधील गाळ काढणे, काही ठिकाणी नव्याने पाणवठे तयार करणे, अशी कामे सध्या वन विभागाच्या वतीने हाती घेतली जात आहेत.

बहुतांश जंगलातील नैसर्गिक आणि कृत्रिम पाणवठे साधारणत: मार्च-एप्रिल महिन्यात कोरडे पडायला सुरवात होते. गेल्या वर्षी चांगला पाऊस होऊनही यंदा मार्चच्या दुसऱ्या आठवड्यातच पाणवठे आटत असल्याचे चित्र दिसत आहे. उन्हाची तीव्रता वाढल्याने काही ठिकाणी पाणीसाठे कोरडे पडले असून, पाण्याच्या शोधात वन्यप्राणी जंगलाबाहेर पडण्याची शक्‍यता वर्तविली जात आहे. या पार्श्‍वभूमीवर वन विभागातर्फे पाणवठ्यांची पाहणी करण्यात येत असून, कोरड्या पाणवठ्यांत पाणी टाकण्याची कामे हाती घेण्यात आली आहेत.

पौड येथील वनपरिक्षेत्र अधिकारी पी. व्ही. कापसे म्हणाले, ‘‘बावधन, पौड, चांदणी चौक, पिरंगुट ते ताम्हिणी परिसरात तीन कृत्रिम पाणवठे आहेत. या जंगलात भेकर, चितळ, रानससा, रानडुक्कर, मोर आदी वन्यजीव आढळतात. साधारणपणे मे, एप्रिलमध्ये येथे पाणीटंचाई जाणवू लागते; मात्र यंदा हे तिन्ही पाणवठे मार्च महिन्यातच कोरडे पडले आहेत. त्यामुळे वन्यप्राणी, पक्ष्यांची गैरसोय होत असून, ती टाळण्यासाठी वन विभागातर्फे पावले उचलण्यात येत आहेत.’’

अभयारण्यात असणाऱ्या नैसर्गिक जलस्रोतांमधील गाळ काढून त्यांची साठवणूक क्षमता वाढविली जाणार आहे. अभयारण्यात सध्या चार ते पाच कृत्रिम पाणवठे असून, मे महिन्यात परिस्थिती विचारात घेऊन कृत्रिम पाणवठ्यांची संख्या वाढविण्याची आवश्‍यकता आहे.
- जहांगीर शेख, वनपरिक्षेत्र अधिकारी, ताम्हिणी अभयारण्य
 

बावधन ते ताम्हिणी परिसरात नव्याने तीन पाणवठे बांधण्यात येणार आहेत. त्याची पूर्वतयारी म्हणून जुन्या पाणवठ्यातील गाळ काढण्याचे काम सुरू आहे. त्याशिवाय कपबशीच्या आकारातील तीन पाणवठे नव्याने बांधले जाणार आहेत.

- पी. व्ही. कापसे, वनपरिक्षेत्र अधिकारी, पौड

२१ कृत्रिम पाणवठ्यांचा प्रस्ताव
ताम्हिणी अभयारण्यात मोठ्या प्रमाणात नैसर्गिक पाणवठे, झरे असल्याने सध्यातरी येथे टंचाई जाणवत नाही; परंतु मे महिन्यात येथील जलस्रोत कोरडे पडतात. त्या वेळी वन्यजीवांचे हाल होऊ नयेत, म्हणून जलयुक्त शिवार योजनेंतर्गत येथे २१ कृत्रिम पाणवठ्यांचा प्रस्ताव तयार केला आहे, अशी माहिती अभयारण्याचे वनपरिक्षेत्र अधिकारी जहांगीर शेख यांनी दिली.

Web Title: wildanimal water issue