Vidhan Sabha 2019 : बाळासाहेब नेवाळे राष्ट्रवादीला सोडणार?

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 9 ऑक्टोबर 2019

वडगाव मावळ : राष्ट्रवादी काँग्रेसने उमेदवारी डावलून ग्रामीण भागावर अन्याय केल्यामुळे पक्षातून बाहेर पडण्याचा निर्णय जिल्हा बँकेचे संचालक बाळासाहेब नेवाळे यांच्या समर्थकांनी येथील मेळाव्यात घेतला. येत्या चार-पाच दिवसांत याबाबत अंतिम निर्णय जाहीर करण्याची घोषणा नेवाळे यांनी केली.

वडगाव मावळ : राष्ट्रवादी काँग्रेसने उमेदवारी डावलून ग्रामीण भागावर अन्याय केल्यामुळे पक्षातून बाहेर पडण्याचा निर्णय जिल्हा बँकेचे संचालक बाळासाहेब नेवाळे यांच्या समर्थकांनी येथील मेळाव्यात घेतला. येत्या चार-पाच दिवसांत याबाबत अंतिम निर्णय जाहीर करण्याची घोषणा नेवाळे यांनी केली.
 
नेवाळे यांनी बुधवारी (ता. 9) येथील भेगडे लॉन्स मंगल कार्यालयात समर्थकांचा मेळावा आयोजित केला होता. माजी तालुकाध्यक्ष गणेश ढोरे, अतिष परदेशी, यदुनाथ डाखोरे, पंढरीनाथ ढोरे, अमीन शेख, नारायण गायकवाड, रमेश गायकवाड, प्रकाश पवार, मिकी कोचर उपस्थित होते. 

नेवाळे म्हणाले की, ''पक्षाने निष्ठावंत कार्यकर्त्याला व ग्रामीण भागाला डावलून जातीयवादी विचाराच्या माणसाला उमेदवारी दिली आहे, ज्यांनी लोकसभेच्या निवडणुकीत अजित पवारांच्या मुलाच्या विरोधात काम केले होते. पक्षासाठी केलेले काम न पाहता पैशाच्या जिवावर ही उमेदवारी दिली आहे. तत्त्व, निष्ठा, विचार यांना तिलांजली दिली आहे. पैशावरच उमेदवारी असेल तर, पवारांचा विचार कोठे राहिला. ज्यांच्याकडे पैसा नाही, त्याने निवडणूक लढवायचीच नाही का, असा प्रश्‍न त्यांनी केला. चार चौकडीच्या विचाराने उमेदवारी कापली आहे असा आरोपही त्यांनी केला. पक्षातून बाहेर पडायचा निर्णय करायचा का, अशी विचारणा त्यांनी कार्यकर्त्यांना केली. कार्यकर्त्यांनी हात उंचावून त्यास संमती दिली. त्यावर चार-पाच दिवसात अंतिम निर्णय जाहीर करण्याची घोषणा नेवाळे यांनी केली. हरीश कोकरे यांनी प्रास्ताविक केले. अतुल सातकर यांनी सूत्रसंचालन केले. किरण हुलावळे यांनी आभार मानले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Will Balasaheb Navale leaves NCP