भाजपचे बंडोबा थंड होणार का?

उत्तम कुटे
सोमवार, 6 फेब्रुवारी 2017

"तिकिट वाटपात मुंडे गटाला डावलण्यात आले असून खासदार अमर साबळे यांनीच
आमच्या या गटाची माती केली आहे''.
- राजू दुर्गे

पिंपरी - पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीचे चित्र अर्ज माघारीनंतर उद्या (ता.7) स्पष्ट होणार असून बहुतांश ठिकाणी भाजप विरुद्ध राष्ट्रवादी अशी लढत होणार आहे. तर अनेक ठिकाणी ती भाजप, राष्ट्रवादी आणि शिवसेना अशी तिरंगी होण्याची शक्‍यता आहे. दरम्यान, राष्ट्रवादीच्या तुलनेत शहरात भाजपमध्ये बंडाळी मोठी असून ही मोठी डोकेदुखी दूर करण्यासाठी युद्ध पातळीवर प्रयत्न सुरू झाले आहेत. दुसरीकडे,मात्र अपक्ष म्हणून रिंगणात असलेल्या बहुतांश एकनिष्ठांनी माघार घेतली नाही,तर "एकनिष्ठ भाजप'मार्फत राष्ट्रवादी बनलेल्या शहर भाजपच्या तोंडी फेस आणणार असल्याचे काळभोरनगर,चिंचवड येथून रिंगणात असलेले आणि भाजपने उमेदवारी डावललेले राजू दुर्गे या शहर उपाध्यक्षांनी सांगितले. मात्र, दुर्गे यांच्यासह बहुतांश बंडोबा उद्या थंडोबा होऊन त्यांच्या तलवारी म्यान होण्याचे संकेत मिळाले आहेत.

दरम्यान,प्रदेश पातळीवर देण्यात आलेली तिकिटे स्थानिक नेत्याने राष्ट्रवादीतून आलेल्या आपल्या समर्थकांची वर्णी लावण्यासाठी कापली, असा आरोप ती न मिळालेल्या 12 मूळ भाजपायींनी केला आहे. हा आरोप करताना त्यांचा रोख शहराध्यक्ष लक्ष्मण जगताप यांच्याकडे होता. त्यामुळे आमचा रोष हा पक्षाविरुद्ध नसून पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ध्येयधोरणे आम्हाला मान्यच आहेत, असे दुर्गे यांनी स्पष्ट केले. मात्र, पक्षाने तिकीट नाकारलेले एकनिष्ठ एकत्र राहिले,तर एकनिष्ठ भाजपमार्फत आम्ही टक्कर देणार आहोत, असे ते म्हणाले.तर, पत्ता कापण्यात आलेले शहर सरचिटणीस अमोल थोरात यांनी, तर यासंदर्भात थेट प्रदेशाध्यक्षांनाच गाऱ्हाणे घातले आहे. त्या पत्रात त्यांनी स्थानिक भाजपवर सडकून टीका केली आहे. वरून देण्यात आलेली 12 एकनिष्ठांची तिकिटे जगताप यांनी कापली असून यासंदर्भात "हायकमांड'विरुद्ध आमची नाराजी नसल्याचे शहर संघटक सचिव माऊली थोरात यांनी सांगितले.दरम्यान, दुर्गे यांच्यासह थोरात आणि वीणा सोनवलकर आदींनी सोशल मिडीयावरून आपला प्रचार सुरूच ठेवला आहे.

 

Web Title: will BJP rebels calm down?