‘स्पेशल बस’ची संख्या वाढविणार

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 6 मे 2017

पीएमपीच्या प्रवाशांत महिला प्रवाशांची संख्या मोठी आहे. ही बाब प्रशासनाने लक्षात घेतली आहे. सध्या मार्गांच्या सुसूत्रीकरणाची प्रक्रिया सुरू असून त्यात महिला स्पेशल बसचे नियोजन करता येईल. गर्दीच्या मार्गांवर आणि प्रवासी महिलांची संख्या लक्षात घेऊन या बाबतचे नियोजन केले जाईल.
- तुकाराम मुंढे, पीएमपीचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक

पुणे - प्रवासी महिलांची संख्या लक्षात घेऊन गर्दीच्या मार्गांवर बस संख्या वाढविण्यात येईल का, या बाबतचे नियोजन प्रशासन करीत असल्याची माहिती पीएमपीचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक तुकाराम मुंढे यांनी शुक्रवारी दिली.

प्रवासी महिलांची संख्या मोठी असूनही त्यांच्यासाठी पुरेशा बस नसल्याचे ‘सकाळ’ने केलेल्या पाहणीत नुकतेच आढळून आले. त्या बाबतचे वृत्तही शुक्रवारी प्रसिद्ध झाले. पीएमपी प्रशासनाने मनपा भवन ते भेकराईनगर, मनपा ते वारजे माळवाडी, शिवाजीनगर ते कात्रज आणि कात्रज ते महाराष्ट्र हौसिंग बोर्ड (येरवडा) हे चार मार्ग सुरू असल्याचे सांगितले होते. प्रत्यक्षात मनपा भवन ते भेकराईनगर हा मार्ग वगळता उर्वरित तिन्ही मार्ग सुरू असल्याचे दिसून आले होते. या तीन मार्गांवर सध्या सकाळी आणि सायंकाळी महिला स्पेशल बस सुरू आहे. पीएमपीच्या प्रवाशांत महिलांची संख्या जास्त असल्यामुळे त्यांच्यासाठी स्वतंत्र बससेवा सुरू असावी, अशी मागणी महिला संघटनांकडून होत आहे.

दरम्यान, मनपा भवन ते भेकराईनगर या मार्गावरील महिला स्पेशल बस बंद का आहे, याची चौकशी करून त्या बाबत कारवाई केली जाईल, असे पीएमपीच्या वाहतूक विभागाने स्पष्ट  केले आहे.

कचरा निर्मूलनाबाबत गौरव
नवी मुंबईत महापालिका आयुक्त पदावर असताना कचरा निर्मूलन आणि प्रक्रिया, याबाबत उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल राज्य सरकारने तुकाराम मुंढे यांचा मुंबईत गुरुवारी गौरव केला. मुंढे यांच्या प्रयत्नांमुळे नवी मुंबईत कचऱ्याचे ओला आणि सुका असे वर्गीकरण ८० टक्‍क्‍यांपर्यंत वाढले. तसेच कचऱ्यावरील प्रक्रियेला वेग देण्यातही त्यांनी महत्त्वपूर्ण कामगिरी बजावली होती. त्याची दखल घेऊन हा गौरव करण्यात आला आहे.

जाहिरातींच्या ऑडिटची मागणी
पीएमपीच्या बस थांब्यांवरील जाहिरातींचे तातडीने ऑडिट करण्याची मागणी क्रिएटिव्ह फाउंडेशनचे अध्यक्ष संदीप खर्डेकर यांनी पीएमपीचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक तुकाराम मुंढे यांच्याकडे निवेदनाद्वारे नुकतीच केली. पीएमपीचे पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये सुमारे पाच हजार बस थांबे आहेत. काही थांबे जाहिरातींच्या अधिकाराच्या मोबदल्यात ‘बीओटी’ तत्त्वावर उभारले आहेत; परंतु ‘बीओटी’ची मुदत संपली आहे. तरीही त्यांना बेकायदा मुदतवाढ दिली आहे. त्यामुळे मुदत संपल्यावरही संबंधित कंत्राटदार जाहिरातींचे उत्पन्न वसूल करीत आहेत. त्यांच्याकडून आकारण्यात येणाऱ्या जाहिरातींच्या दरातही मोठी विसंगती आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी केल्यास मोठा भ्रष्टाचार उघड होईल, असे खर्डेकर यांनी पीएमपी अध्यक्षांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.

आगारांतील अतिक्रमणे हटवा
‘‘शहर आणि पिंपरी-चिंचवड येथील पीएमपी आगारांमधील अतिक्रमणे तातडीने हटवा. यासाठी वेळप्रसंगी महापालिका आणि पोलिसांची मदत घ्या,’’ असा आदेश पीएमपीचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक तुकाराम मुंढे यांनी दिला. कात्रज आणि डेक्कन स्थानकात त्याची अंमलबजावणीही केली आहे. कात्रजमधील बस स्थानकाच्या आवारात अनधिकृत हातगाड्या उभ्या राहत असल्यामुळे बस वळविताना त्रास होत असल्याचे कात्रजमधील शिवशंभो प्रतिष्ठानचे अध्यक्ष महेश कदम यांनी मुंढे यांच्या निदर्शनास आणून दिले होते. त्याची दखल घेऊन ही कारवाई करण्यात आली आहे. महिला प्रवाशांसाठी स्वच्छतागृह कार्यान्वित करण्याची मागणीही कदम यांनी केली. त्याबाबत तातडीने उपाययोजना करणार असल्याचे आश्‍वासन मुंढे यांनी दिले.

Web Title: Will increase the number of special buses