पुणे : जिल्ह्यातील आणखी 15 शाळांची होणार चौकशी

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 1 नोव्हेंबर 2019

- बोगस शिक्षक नियुक्‍त्या

- सुमारे सव्वादोन कोटींचा अपहार

पुणे : पुणे, पिंपरी चिंचवड शहर आणि जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील सुमारे 20 शाळांनी शिक्षकांच्या बोगस नियुक्‍त्या केल्याचा प्राथमिक अंदाज जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने वर्तविला आहे. यापैकी आतापर्यंत दोन शाळांवर फौजदारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याशिवाय येत्या आठवडाभरात आणखी 15 शाळांमधील शिक्षक भरती व नियुक्‍त्यांची कागदपत्रांची पडताळणी केली जाणार आहे. यासाठी संबंधित शाळांना चौकशीसाठी बोलावण्यात येणार असल्याचे शुक्रवारी (ता.1) जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागातून सांगण्यात आले.

या बोगस नियुक्‍त्यांच्या माध्यमातून संबंधित शाळांनी आतापर्यंत दोन कोटी 28 लाखांचे अनुदान लाटल्याचे जिल्हा परिषदेच्यावतीने करण्यात आलेल्या चौकशीतून निष्पन्न झाले आहे. पुणे व पिंपरी चिंचवड शहर आणि जिल्ह्याच्या
ग्रामीण भागातील खासगी प्राथमिक शाळांनी शिक्षकांच्या बोगस नियुक्‍त्या केल्याचा मुद्दा जिल्हा परिषदेच्या 9 सप्टेंबर 2019 रोजी झालेल्या सर्वसाधारण सभेत उपस्थित करण्यात आला होता.

याप्रकरणी दोषींवर फौजदारी कारवाई करण्याची मागणीही सर्वपक्षीय जिल्हा परिषद सदस्यांनी या सर्वसाधारण सभेत केली होती. यानुसार 19 ऑक्‍टोबर 2019 रोजी दोन शाळांवर फौजदारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामध्ये आजी-माजी चार वरिष्ठ अधिकाऱ्यांसह 28 संशयित आरोपींचा
समावेश आहे. हा गुन्हा आता आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग झाला आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: will Inquiry of 15 more schools in Pune district